जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी धरणे
By admin | Published: April 6, 2017 05:40 AM2017-04-06T05:40:44+5:302017-04-06T05:40:44+5:30
शासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत, महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाने बुधवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले.
मुंबई : जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यास शासनाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत, महाराष्ट्र आदिवासी ठाकूर जमात सेवा मंडळाने बुधवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले. लक्ष वेधण्यासाठी केलेल्या या आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही, तर पावसाळी अधिवेशनापासून हजारो आदिवासी ठाकूर जमात बांधव बेमुदत उपोषण करतील, असा इशारा संघटनेचे संघटक अध्यक्ष आत्माराम ठाकूर यांनी दिला.
सोबत ज्या कुटुंबात वैधता प्रमाणपत्र नसेल, त्यात त्यांनी दिलेले सन १९५० पूर्वीचे पुरावे ग्राह्य धरून सकारात्मक चौकशी करून किंवा जवळच्या नातेवाईकाच्या वैधतेचा आधार घेऊन वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे.
अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने ठाकूर जमातीच्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने रद्दबातल केला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार, समित्यांनी ठाकूर समाजाला जात वैधता प्रमाणपत्र तत्काळ अदा करण्याची मागणी मंडळाने केली आहे. (प्रतिनिधी)
>आश्वासन पाळा
ठाकूर म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने वारंवार दिलेल्या आदेशानंतरही, आदिवासी विकास विभाग व आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था, पुणे यांच्याकडून न्यायालयाच्या निर्णयाची पायमल्ली होत आहे. या संदर्भात आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांच्याशी चर्चाही झाली. तरी सरकारने आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था आणि सर्व अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्यांना उमेदवारांचे प्रलंबित जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र नियमित अदा करण्यासंदर्भात आदेश द्यावे, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.