जिल्हास्तरावर होणार जात पडताळणी
By admin | Published: November 18, 2016 10:21 PM2016-11-18T22:21:58+5:302016-11-18T22:21:58+5:30
मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हास्तरीय जात पडताळणी कार्यालय कार्यान्वित होणार आहे.
ऑनलाइन लोकमत
धुळे, दि. 18 - मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हास्तरीय जात पडताळणी कार्यालय कार्यान्वित होणार आहे. याची अंमलबजावणी २१ नोव्हेंबरपासून होणार आहे. अशी माहिती धुळे येथील विभागीय जात पडताळणी कार्यालयाचे पी.बी.नाईक यांनी दिली.
सामाजिक न्याय विभागाचा निर्णय
या संदर्भात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग यांनी ११ नोव्हेंबर रोजी निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यांकरिता जिल्हा जात पडताळणी समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
अधिकाऱ्यांची नियुक्ती
यासाठी प्रत्येक जिल्ह्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी व नागरिकांच्या माहितीसाठी कार्यालयाचे पत्तेही जाहीर करण्यात आले आहेत. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे नियमित दैनंदिन कामकाज दिनांक २१ नोव्हेंबर २०१६ पासून नियमित सुरू होणार आहे. आता सर्व संबंधित नागरिक, विद्यार्थी, पालक, कर्मचारी, महाविद्यालये, सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालय प्रमुख यांनी आप-आपल्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आपले परिपूर्ण जातीदावा प्रस्ताव जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा समितीकडे प्रकरणे वर्ग
ज्या जातीदावा प्रस्तांवामध्ये धुळे समितीकडे असलेल्या ज्या प्रस्तावांमध्ये त्रुटी आढळलेल्या आहेत, अशी सर्व प्रकरणे संबंधित जिल्हा समितीकडे वर्ग करण्यात आलेली आहेत. सर्व विद्यार्थी व अर्जदारांनी संबंधित जिल्हा समित्यांकडे त्रुटींची पूर्तता व चौकशी करावी. असे आवाहन समितीच्यावतीने अध्यक्ष टी.एम.बागुल, उपायुक्त पी.बी.नाईक व सदस्य सचिव वंदना कोचुरे यांनी केले आहे.