वर्सोवा पूल बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2016 02:48 AM2016-08-06T02:48:03+5:302016-08-06T02:48:03+5:30

१९६६-७० साली मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदरनजिक वसई खाडीवर बांधण्यात आलेला पूल अतिशय धोकादायक स्थितीत

Versova bridge becomes dangerous | वर्सोवा पूल बनला धोकादायक

वर्सोवा पूल बनला धोकादायक

Next

शशी करपे,

वसई- १९६६-७० साली मुंबई-अहमदाबाद हायवेवर घोडबंदरनजिक वसई खाडीवर बांधण्यात आलेला पूल अतिशय धोकादायक स्थितीत असून यावरून अवजड वाहनांना वाहतूकीला प्रतिबंध करावा असे पत्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जिल्हाधिकाऱ्यांना ११ जुलै २०१४ रोजी दिले होते. मात्र, त्यानंतरही या पूलावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरु असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वसई खाडीवर घोडबंदरनजिक १९६६ साली पूलाचे बांधकाम सुरु होऊन १९७० साली पूलाचे बांधकाम पूर्ण होऊन त्यावरून वाहतूक सुरु करण्यात आली. वर्सोवा पूल म्हणून परिचित असलेल्या पूलाला वसई खाडी पूल असेही म्हटले जाते. त्याकाळच्या वाहनांची वर्दळ लक्षात घेऊन बांधण्यात आलेल्या या पूलावरून सध्या कितीतरी अधिक पटीने वाहतूक सुरु आहे. त्यात अवजड वाहनांचे प्रमाण सर्वाधिक आहे. मुंबई-सूरत मार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतर या पूलाच्या शेजारी नवा पूल बांधण्यात आली. त्यानंतर दोन्ही पूलावरुन एकेरी वाहतूक सुरु झाली.
सध्या पूलाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. संरक्षक कठडेही अनेक ठिकाणी तुटले आहेत. डिसेंबर २०१३ ला या पूलाच्या एका गर्डरला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर या पुलावरील वाहतूक तब्बल साडेतीन-चार महिने बंद ठेवण्यात आली होती. तडे गेलेला गर्डर बदलून त्याजागी नवीन ४८ मीटरलांबीचा गर्डर बसवण्यात आल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात आली होती. याआधी १९८९ साली पूलाची दुरुस्ती आणि मजबूतीकरण करण्यात आले होते. त्यानंतर २००० मध्ये पुन्हा पुलाची दुरुस्ती आणि मजबूतीकरण करण्यात आले होते.
नवा गर्डर बसवण्यात आल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तत्कालीन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांसह राज्यसरकारच्या संबंधित खात्यांना ११ जुलै २०१४ रोजी पत्र पाठवून पूलासंबंधी अनेक सूचना केल्या आहेत. त्यात १५ टनांहून अधिक क्षमतेच्या वाहनांना या पूलावरून वाहतूक करण्यास बंदी घालण्याची सूचना केली आहे. एनएच-८ हा राष्ट्रीय महामार्ग आर्थिक उलाढालीच्या दृष्टीने महत्त्वाचा महामार्ग समजण्यात येतो. त्यामुळे महामार्गावरून सतत अवजड वाहने ये-जा करीत असतात.
>फक्त हलक्या वाहनांना प्रवेश द्यावा!
पुलाच्या बांधकामाची रचना ही तेव्हाच्या वाहतुकीचा लक्षात घेऊन करण्यात आली होती. मात्र आता वाहनांची आणि त्यातही मोठ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे. ते पाहता पूल धोकादायक आणि मोठ्या अपघातास कारण ठरू शकतो. कारण या पुलास पुन्हा तडे गेले आहेत. परिणामी या पुलावरून मोठ्या अवजड वाहनांना वाहतूक करण्यास तत्काळ बंदी घालावी. या पुलावरून फक्त दुचाकी, तीनचाकी, चारचाकी यासारख्या हलक्या वाहनांनाच प्रवेश द्यावा. तसेच अवजड वाहने (१५ टनाहून अधिक सामान नेणारी वाहने) या पुलावरून ये-जा करणार नाहीत, या दृष्टीने संबंधित आरटीओ विभागाने योग्य ती यंत्रणा उभारावी. कारण मोठ्या वाहनांची या पुलावरून ये-जा सुरू राहिली तर एखादी मोठी दुर्घटना घडू शकते. तसेच या पुलावर कोणत्याही वाहनाच्या पार्किंगवरही तातडीने निर्बंध घालावेत, असे प्राधिकरणाने पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title: Versova bridge becomes dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.