लष्करात मुलींना खूप चांगल्या संधी - श्रुती श्रीखंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 02:15 AM2018-02-03T02:15:53+5:302018-02-03T02:16:37+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या ‘कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस’ (सीडीएस) या परीक्षेत पुण्याची श्रुती विनोद श्रीखंडे ही मुलींमध्ये देशात पहिली आली आहे. ब्रिगेडियर असलेल्या विनोद श्रीखंडे यांची श्रुती मुलगी असून, तिने वडिलांचा वारसा पुढे कायम ठेवला आहे. या उज्ज्वल यशाबद्दल देशभरातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो आहे. या पार्श्वभूमीवर तिने ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. तिच्याशी साधलेला संवाद...
श्रुती श्रीखंडे म्हणाली, बंगळुरूला झालेल्या मुलाखतीनंतर मेरिटमध्ये येईन अशी अपेक्षा होती, मात्र देशात पहिली येईन असे मात्र वाटले नव्हते. त्यामुळे देशात पहिली आल्याचा निकाल समजल्यानंतर आम्हा सर्वांना आनंदाचा मोठा धक्का बसला.
शाळेत असतानाच लष्करात जाण्याचा निर्णय घेतला होता. बारावीनंतर आयएलएस लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. समांतरपणे सीडीएस परीक्षेची तयारी करीत होते. सीडीएस परीक्षा आणि लॉ यांचा एकाच वेळेस अभ्यास करायचा असल्याने त्याचे एक वेळापत्रक निश्चित करून अभ्यास केला. दररोजच्या वर्तमानपत्रातील बातम्यांच्या नोट्स काढून चालू घडामोडींचा अभ्यास केला. सीडीएसच्या अभ्यासासाठी मुख्यत: मूलभूत संकल्पना पक्क्या करण्यावर भर दिला. त्यासाठी एनसीआरटीची इयत्ता ६वी ते १०वी ची पुस्तके वाचून काढली.
लॉच्या अभ्यासासाठी लेक्चरला नियमित उपस्थित राहात होते. त्याचबरोबर परीक्षेच्या एक महिना अगोदर त्याच्या अभ्यासासाठी वेळ दिला. मुख्यत: वेळेचे नियोजन त्यासाठी उपयोगी ठरले.
लष्करात जाणे पक्के असताना बारावीनंतर लॉमधून पदवी मिळविण्याचा निर्णय घेतला. मला पॉलिसी मेकिंग, राज्यघटना यांची विशेष आवड आहे. सीडीएसच्या परीक्षेत राज्यघटनेवर अनेक प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर लष्करात जॅक म्हणून एक एंट्री असते. त्यामध्ये मिलिटरी लॉयर म्हणून तुमची निवड होते. त्यामुळे कायद्याची पदवीधर होण्याचा निर्णय घेतला.
देशातील इतर कोणत्याही सर्व्हिसेसमधील मुलाखतींपेक्षा सीडीएससाठी घेतली जाणारी मुलाखत अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. मुळात मुलाखत ही अनपेक्षित असते. लेखी परीक्षेतील संभाव्य प्रश्न माहीत असतात, मुलाखतीचे मात्र तसे नसते. सीडीएसची मुलाखत ही ५ दिवस चालणारी प्रक्रिया होती. आम्हाला बंगळुरूमध्ये मुलाखतीला बोलावले होते. मुलाखतीच्या या ५ दिवसांमध्ये विविध पद्धतीने तुम्हाला जोखले जाते. तुमच्यामध्ये अधिकारीपदाची गुणवत्ता आहे का हे मुख्यत: याद्वारे तपासले जाते.
लष्करी अधिकाºयाचे व्यक्तिमत्त्व डायनामिक असते. त्यासाठी आवश्यक असणारे गुण मुलाखत देणाºया विद्यार्थ्यांमध्ये आहेत का, हे तपासले जाते. आमच्या मुलाखतीची सुरुवात सकाळी ६ वाजल्यापासून होत असे. त्यामध्ये मानसिक चाचणी, नेतृत्त्वगुण, सामाजिक दायित्व आदी अनेक गुणांची तपासणी केली जाते.
एखाद्या कठीण परिस्थितीला तुम्ही कसे सामोरे जाऊ शकाल याची चाचपणी केली जाते. या सर्व खडतर परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच तुमचा अधिकारी बनण्याचा मार्ग मोकळा होतो.
घरी जरी लष्करी सेवेची परंपरा असली तरी डिफेन्समध्ये जाण्याचा निर्णय माझा स्वत:चा होता. लष्कराच्या कॅम्पमध्ये राहताना तिथली शिस्त मी जवळून पाहिली होती. लष्कराच्या त्या
वर्दीचे मला लहानपणापासूनच विशेष आकर्षण वाटत आले. त्यामुळे मी लष्करी सेवेत जाण्याचा निर्णय घेतला. घरी याबाबत सांगितल्यानंतर आई व वडिलांनी याला पूर्ण पाठिंबा दिला अन् मी परीक्षेची तयारी सुरू केली.
डिफेन्सबरोबरच मी इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होते. मात्र माझे सर्वाधिक प्राधान्य लष्करातील सेवेलाच आहे. आयएएस, आयपीएस या पोस्ट निश्चितच सन्मानाच्या आहेत. मात्र लष्करी अधिकारी ही अत्यंत साहस व धैर्याची पोस्ट आहे. त्याद्वारे देशाचे रक्षण करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या सेवेलाच माझे प्राधान्य राहील.
मुली लष्करामध्ये चांगले कर्तृत्व गाजवत आहेत. त्यांना माझे आवाहन आहे, की लष्करात जाण्याचे स्वप्न निश्चित बघा. तुम्हाला कुणी सांगेल, डिफेन्स हे महिलांसाठी नाही, त्याकडे लक्ष देऊ नका. चांगला अभ्यास करा, व्यक्तिमत्त्व विकसित करा अन् परीक्षेत यश मिळवून चांगल्या लष्करी अधिकारी बना.