नाझरे जलाशयात अत्यल्प पाणीसाठा
By admin | Published: November 4, 2016 01:20 AM2016-11-04T01:20:06+5:302016-11-04T01:20:06+5:30
वर्षीही जेजुरी परिसर, तसेच नाझरे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अत्यल्प राहिल्याने जलाशयातील पाणीसाठा अत्यल्प राहिला.
जेजुरी : या वर्षीही जेजुरी परिसर, तसेच नाझरे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमान अत्यल्प राहिल्याने जलाशयातील पाणीसाठा अत्यल्प राहिला. यामुळे या वर्षभरात पाण्याचे नियोजन आजपासूनच करणे आवश्यक आहे. अन्यथा तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत.
नाझरे जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात अत्यल्प पर्जन्यमान राहिल्याने या जलाशयात या वर्षी पाणीसाठा कमीच उपलब्ध झाला आहे. जलाशयात केवळ ४० टक्केच पाणीसाठा होऊ शकलेला आहे. आता पावसाळाही संपला असून, पावसाची शक्यताही राहिलेली नाही. यामुळे उपलब्ध पाणी वर्षभर वापरावे लागणार आहे. पूर्व पुरंदर आणि पश्चिम बारामती
तालुक्यातील सुमारे सव्वालाख लोकसंख्येला वर्षभर पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी पाण्याचे नियोजन आता गरजेचे बनलेले आहे.
नाझरे जलाशयात केवळ ३२१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध असून, त्यातील १२२ दशलक्ष पाणीसाठा उपयुक्त मानला जातो. नाझरे जलाशयावरून मोरगाव व १६ गावे, पारगाव व २३ गावे, नाझरे व ५ गावे, जेजुरी शहर, औद्योगिक वसाहत, आई. एस. एम. टी. कंपनीसह सुमारे ५० गावे व वाड्यावस्त्या, त्याचबरोबर जलाशयावरील एकूण १७० शेती सिंचन योजना आणि
पुरंदर तालुक्यातील १४०० हेक्टर आणि बारामती तालुक्यातील १७०० हेक्टर क्षेत्राला दोन आवर्तनाद्वारे शेतीलाही पाणीपुरवठा केला जातो. जलाशयाची क्षमता ७८८ दशलक्ष घनफूट असल्याने हे शक्य होते. मात्र, जलाशय पूर्ण क्षमतेने भरलेला नसल्याने आता शेतीला पाणीपुरवठा करणे शक्यच नाही. उपयुक्त पाणीसाठ्यातील एकूण ५० गावांना पिण्याचे पाणी दररोज बारा तास
दिले जात असल्याने ते वर्षभर पुरवावे लागणार आहे.
पूर्ण क्षमतेने जलाशय भरलेला असेल, तर शेती सिंचन योजनांना वर्षाकाठी ५० ते ६० दशलक्ष घनफूट व बारामती आणि पुरंदर तालुक्यातील ३१०० हेक्टरसाठी खरीप व रब्बी हंगाम आवर्तनाद्वारे १५० ते १८० दशलक्ष घनफूट पाणीपुरवठा दिला जातो. वर्षभरात साधारणपणे ८० ते १०० दशलक्ष घनफूट पाण्याचे बाष्पीभवन होते. उर्वरित पाण्यापैकी मृत साठा
२०० दशलक्ष सोडून इतर पाणी प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांना दिला जातो. अशी साधारण येथील नियोजनाची पद्धत आहे. यंदा मात्र पाणीसाठाच निम्म्यापेक्षा कमी झाला आहे.
(वार्ताहर)
>नाझरे जलाशयावरून फक्त पिण्याच्याच पाण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. शेतीसाठी पाणीपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. जलाशयावरील प्रादेशिक नळ पाणीपुरवठा आणि जेजुरी व औद्योगिक क्षेत्रासाठीच पाणी राखण्यात आलेले आहे. शेतीसाठी पाणी दिले जाणार नसून, त्यासाठी महावितरणच्या सहकार्याने या परिसरातील वीजपुरवठा करणारे सर्व विद्युत जनित्र (डी. पी.) तील विद्युत पुरवठा बंद करण्यात आलेल्या आहेत. यामुळे पाण्याची चोरीही होऊ शकणार नाही. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांची गस्तही वाढवलेली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढील पावसाळ्यापर्यंत यंदा पिण्याच्या पाण्यासाठीच पाण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे.
- नीरज नागोसे, शाखाधिकारी, नाझरे जलाशय
>या वर्षी जलाशयातील आजचा पाणीसाठा केवळ ३२२ दशलक्ष घनफूट आहे.
पैकी २०० दशलक्ष घनफूट मृतसाठा वगळता केवळ १२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठाच उपयोगात आणावा लागणार आहे. त्या पाण्याचे नियोजन आतापासून न केल्यास उन्हाळ्यातील परिस्थिती
अत्यंत गंभीर राहणार आहे.