उल्हासनगरात देखाव्यात ठेवले चक्क जिवंत पक्षी
By admin | Published: September 14, 2016 04:27 AM2016-09-14T04:27:01+5:302016-09-14T04:27:01+5:30
शहरातील यूएफसी गणेश मंडळाने प्राण्यांचा देखावा साकारला आहे. पण यासाठी चक्क जिवंत लव्ह बर्ड, पाळीव उंदीर, पोपट ठेवले आहेत
उल्हासनगर : शहरातील यूएफसी गणेश मंडळाने प्राण्यांचा देखावा साकारला आहे. पण यासाठी चक्क जिवंत लव्ह बर्ड, पाळीव उंदीर, पोपट ठेवले आहेत. याला अॅड. जय गायकवाड यांनी आक्षेप घेतला. प्राण्यांना क्रूरतेने वागवत असल्याबद्दल मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात केली आहे. दरम्यान, हिराली फाऊंडेशनच्या मदतीने या पक्ष्यांंची बुधवारी सुटका केली जाणार आहे.
सतरामदास हॉस्पिटल परिसरात हे मंडळ आहे. प्रत्येक वर्षी नावीण्यपूर्ण देखावा मंडळ करत असते. यावर्षी त्यांनी पर्यावरणाचा ऱ्हास व प्राणी संकटात असा देखावा निर्माण केला आहे, असे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. गणेश मंडळ परिसरात पक्ष्यांवर आधारित चित्रही रेखाटली असून पक्ष्याचा पुतळाही उभारला आहे.
नागरिकांमध्ये पक्ष्यांबाबत माहिती आणि जनजागृतीसाठी बाप्पाच्या समोरच लव्ह बर्डस्, विविध जातींचे पोपट व पाळीव उंदीर ठेवले आहेत. यामुळे मंडळावर टीका होत आहे. अॅड गायकवाड यांनी याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त सुनील भारद्बाज यांना दिली. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र सिरसाट यांनी गणेश मंडळाला भेट दिली. कायद्यानुसार हे पक्षी, प्राणी जर प्रतिबंधात्मक पक्ष्यांच्या यादीत येत असतील तर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच उपायुक्त भारद्वाज यांनीही विठ्ठलवाडी पोलिसांना चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती गायकवाड यांनी दिली.
यूएफसी मंडळाचे प्रमुख दिलीप वलेच्छा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल बंद होता. मात्र इतर पदाधिकाऱ्यांनी कायद्यानुसार प्राणी ठेवणे चुकीचे असेल तर पिंजऱ्यात ठेवलेल्या पक्ष्यांना मुक्त केले जाईल असे सांगितले. (प्रतिनिधी)