ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 2 - ज्येष्ठ अभिनेते मधुकर तोरडमल यांचं निधन झालं आहे. वयाच्या 85व्या वर्षी राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तोरडमल हे मूत्रपिंडाच्या आजारानं त्रस्त होते. तोरडमल यांना मूत्रपिंडाचा आजार असल्यानं त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तोरडमल यांना मधुमेहाचाही आजार होता. काही दिवसांपूर्वीच त्यांना एशियन हार्ट रुग्णालयातून त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी आणण्यात आले होते. नाटक, चित्रपट दोन्ही क्षेत्रांत त्यांनी अभिनेत्यासह निर्माता, दिग्दर्शक, लेखक म्हणून नावलौकिक मिळवला. त्यांचे पार्थिव उद्या सकाळी 10 ते 10.30 दरम्यान माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.
तोरडमल यांनी तरुण तुर्क म्हातारे अर्क, गुड बाय डॉक्टर, बॅरिस्टर सारख्या नाटकांमधून काम केले, तर सिंहासन, बाळा गाऊ कशी अंगाई, आपली माणसे अशा मराठी चित्रपटांमधून भूमिका साकारल्या होत्या. तोरडमलांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शन केलेल्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकाचे ५०००हून अधिक प्रयोग झाले आहेत. मधुकर तोरडमलांनी त्या नाटकात प्रोफेसर बारटक्क्यांची भूमिका साकारली होती. एका समीक्षकाने ठळकपणे म्हटले होते, ‘सुशिक्षित, सुसंस्कृत आणि विशेषत: पांढरपेशा स्त्रियांनी हे नाटक अजिबात बघू नये’. पण झाले उलटेच. त्यानंतर रसिकांची उत्सुकता वाढली आणि सुशिक्षित महिला, मुली यांनी अक्षरश: रांगा लावून बुकिंगमध्येच नाटक हाऊसफुल्ल केले. समीक्षकांच्या टीकेचा फायदाच झाला. या नाटकाचे एकाच नाट्यगृहात एकाच दिवशी तीन प्रयोग झाले. ही गोष्ट त्या काळात ‘आश्चर्य’ समजली गेली. पुण्याच्या ’बालगंधर्व’ नाट्यगृहामध्ये मकरसंक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारी 1972 रोजी सकाळ, दुपार, रात्र असे हे 3 प्रयोग झाले. ‘बालगंधर्व’च्या त्या प्रयोगांना येणार्या प्रत्येक पुरुष रसिकाला गुलाबाचे फूल आणि महिलांना गजरे, तसेच तीळगूळ देण्यात आला होता. सकाळच्या प्रयोगाला शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे, दुपारी ग. दि. माडगूळकरआणि रात्रीच्या प्रयोगाला वसंत देसाई ही दिग्गज मंडळी सहकुटुंब हजर होती.
तोरडमल यांनी ‘नाट्यसंपदा’, ‘नाट्यमंदिर’, ‘धी गोवा हिंदू असोसिएशन’ या आणि प्रामुख्याने ‘चंद्रलेखा’च्या नाटयसंस्थेतर्फे सादर झालेल्या नाटकातून कामे केली. ‘गुड बाय डॉक्टर’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘चांदणे शिंपित जाशी’, ‘बेईमान’, अखेरचा सवाल’, ‘घरात फुलला पारिजात’, ‘चाफा बोलेना’, ‘म्हातारे अर्क बाईत गर्क’ आदी अनेक नाटके केली. ‘संगीत मत्स्यगंधा’ या नाटकात त्यांनी साकारलेला ‘भीष्म’ही गाजला. याशिवाय प्रा. मधुकर तोरडमल यांनी ऋणानुबंध, किनारा, गगनभेदी, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, म्हातारे अर्क बाईत गर्क, लव्ह बर्ड्स, विकत घेतला न्याय आदी नाटकांतूनही अभिनय केला.
Web Title: Veteran actor Madhukar Todmal passed away
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.