ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला काळाच्या पडद्याआड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 03:49 AM2021-04-05T03:49:42+5:302021-04-05T03:50:16+5:30
मुख्य अभिनेत्री, खलनायिका, आई अशा विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या.
मुंबई : आपल्या दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला जवळकर यांचे रविवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्या ८८ वर्षांच्या होत्या.
शशिकला यांनी १०० हून अधिक चित्रपटांत काम केले. हिंदी सिनेमाच्या सुवर्णकाळात म्हणजेच सत्तरच्या दशकात त्यांची कारकीर्द अधिक बहरली. मुख्य अभिनेत्री, खलनायिका, आई अशा विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या.
४ ऑगस्ट, १९३२ रोजी सोलापुरातील एका सुखवस्तू कुटुंबात शशिकला यांचा जन्म झाला. पुढे त्यांचे कुटुंब सोलापूर सोडून उदरनिर्वाहासाठी मुंबईला आले. मुंबईत त्यांची गाठ नूरजहाँ यांच्याशी पडली. नूरजहाँ यांनी त्यांना ‘झीनत’ या शौकत रिझवी यांच्या चित्रपटात काम मिळवून दिले. शशिकला यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर निर्माते पी.एन. अरोरा, अमिया चक्रवर्ती आणि व्ही. शांताराम यांचे लक्ष वेधून घेतले. १९५३ साली शांताराम यांनी त्यांना ‘तीन बत्ती चार रास्ता’ या चित्रपटात काम दिले. २०व्या वर्षी ओमप्रकाश सहगल यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. - सविस्तर वृत्त/ ४