ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 08:04 AM2020-09-22T08:04:11+5:302020-09-22T08:42:00+5:30

कोरोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

Veteran actress Ashalata Wabgaonkar passes away | ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे निधन

googlenewsNext

सातारा : मराठी चित्रपट सृष्टीत ‘आशालता’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या गुणी ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे कोरोनामुळे सातारा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणासाठी त्या साताऱ्याला आल्या होत्या. याचठिकाणी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. 

सातारा जिल्ह्यात सध्या ‘देवमाणूस’, ‘आई माझी काळूबाई’ अशा मालिकांचे चित्रीकरण सुरू आहे. सध्या एका मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘आई माझी काळूबाई’ या अलका कुबल यांच्या मालिकेत आशालता यांची प्रमुख भूमिका आहे. या मालिकेचे चित्रीकरण जिल्ह्यातील फलटण, लोणंद, वाई या परिसरामध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू आहे. मालिकेतील एका गाण्यासाठी मुंबईहून एक डान्स ग्रुप आला होता. यातील काहीजणांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता असल्याने या मालिकेतील सेटवरील सुमारे २७ जणांना कोरोनाची लागण झाली होती. ते बाधित आढळल्यानंतर मालिकेचे चित्रीकरण थांबविण्यात आले. मात्र, आशालता यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 

आशालता या मूळच्या गोव्याच्या असून, त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली. त्यांनी आत्तापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे १०० हून अधिक चित्रपटांमधून काम केले आहे. ‘गुंतता हृदय हे, वाऱ्यावरची वरात, चिन्ना आणि महानंदा’ यामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. तर बासू चटर्जी यांच्या ‘अपने पराये’या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते. मराठी चित्रपट सृष्टीत ‘उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नव-याला, वहिनीची माया’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.

 संगीतावर आधारित ‘गर्द सभोवती’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे संगीताचे धडे गिरवताना, आशालताबाईंना गळ्यातून उतरविण्यापूर्वी प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि त्यामागील भाव टिपण्याची सवय लागली होती. राज्य नाट्यस्पर्धेत संशयकल्लोळ नाटकातील नायिका रेवतीची प्रमुख भूमिका साकारणा-या ज्येष्ठ अभिनेत्री गायिकेला गोपीनाथ सावकार यांच्यासारख्या सिद्धहस्त दिग्दर्शकाने अभिनयासाठी निरीक्षणाचे महत्त्व पटवून दिले.

Read in English

Web Title: Veteran actress Ashalata Wabgaonkar passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.