ज्येष्ठ अभिनेत्री शांता मोडक यांचे निधन
By Admin | Published: April 29, 2015 01:16 AM2015-04-29T01:16:53+5:302015-04-29T01:16:53+5:30
सौंदर्य, अभिनय आणि गायन या माध्यमातून रंगभूमीसह चित्रपटसृष्टीचा पडदा गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता भास्कर उर्फ बिंबा मोडक यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले.
पुणे : सौंदर्य, अभिनय आणि गायन या माध्यमातून रंगभूमीसह चित्रपटसृष्टीचा पडदा गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री शांता भास्कर उर्फ बिंबा मोडक यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या. वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर दुपारी अत्यंसंस्कार करण्यात आले.
शांताबार्इंनी दामूअण्णा मालवणकर यांच्या ‘प्रभाकर’ नाटक कंपनीच्या माध्यमातून १९४९ मध्ये ‘भावबंधन’ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर पहिले पाऊल ठेवले. या नाटकातील आनंदीबाईची त्यांची भूमिका खूप गाजली. नाटकात काम करण्याची संधी मिळाल्यावर शांताबार्इंनी गाणे शिकण्यास सुरूवात केली. संगीत नाटकातील पदांचे शिक्षण त्यांनी गंधर्व नाटक मंडळीतील बालगंधर्व आणि मास्तर कृष्णराव फुलंब्रीकर यांचे पट्टशिष्य व गायक-नट कै. हरिभाऊ देशपांडे यांच्याकडे घेतले. संगीत विद्याहरण ( देवयानी), संगीत स्वयंवर (रूख्मिणी), संगीत सौभद्र (सुभद्रा), संगीत द्रौपदी (द्रौपदी), संगीत एकच प्याला (सिंधू), संगीत भावबंधन, (लतिका), संगीत मृच्छकटिक (वसंतसेना) या संगीत नाटकातील त्यांच्या भूमिका अत्यंत लोकप्रिय झाल्या. त्यांनी भारत नाटक कंपनी, संध्या थिएटर, पंडितराव तरटे यांच्या नाटक कंपनीमधील नाटकांमध्ये कामे केली. यामध्ये छोटा गंधर्व, श्रीपादराव नेर्लेकर, कृष्णराव तोंडकर, जयराम शिलेदार अशा गायक-नटांबरोबर त्यांनी भूमिका केल्या. रंगभूमीबरोबरच चित्रपटांमध्येही त्यांच्या अभिनयाचे दर्शन रसिकांना घडले. ‘चूल मूल’, ‘ऊन-पाऊस,’ ‘इन मिन साडे तीन’ या चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनयाची चुणूक दाखविली. राज्य सरकारतर्फे १९८० मध्ये त्यांना मराठी नाटक शताब्दी महोत्सवामध्ये तत्कालिन मुख्यमंत्री बॅ. अंतुले यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुणे महापालिकेसह अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे.