रंगभूमीवरचे ‘मामा’ काळाच्या पडद्याआड : ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे निधन

By Admin | Published: July 3, 2017 05:19 AM2017-07-03T05:19:43+5:302017-07-03T05:19:43+5:30

‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘चांदणे शिंपित जाशी’, ‘बेईमान’, ‘अखेरचा सवाल’, ‘चाफा बोलेना’, ‘संगीत मत्स्यगंधा’ अशा असंख्य नाटकांच्या

Veteran artist Madhukar Toddmal passes away | रंगभूमीवरचे ‘मामा’ काळाच्या पडद्याआड : ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे निधन

रंगभूमीवरचे ‘मामा’ काळाच्या पडद्याआड : ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे निधन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’, ‘गुड बाय डॉक्टर’, ‘चांदणे शिंपित जाशी’, ‘बेईमान’, ‘अखेरचा सवाल’, ‘चाफा बोलेना’, ‘संगीत मत्स्यगंधा’ अशा असंख्य नाटकांच्या माध्यमातून मराठी रंगभूमी गाजविलेले ज्येष्ठ रंगकर्मी मधुकर तोरडमल यांचे रविवारी निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन कन्या असा परिवार आहे.
मूत्रपिंडाच्या विकाराने ते काही काळापासून त्रस्त होते. रविवारी संध्याकाळी वांद्रे येथील साहित्य सहवासातील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी माटुंगा येथील यशवंत नाट्यगृहाच्या प्रांगणात सकाळी १० वाजता त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
मराठी रंगभूमीवर ‘मामा’ म्हणून लोकप्रिय असलेले प्रा. तोरडमल यांचा ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकातील ‘प्राध्यापक बारटक्के’ नाट्यरसिकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिला. या नाटकाने रेकॉर्डब्रेक अशा पाच हजार प्रयोगांचा टप्पा गाठल्याने तोरडमलांचा ‘ह’च्या बाराखडीतला ‘प्रा. बारटक्के’ मराठी रंगभूमीच्या इतिहासात कायमचा अजरामर झाला. पुण्याच्या ‘बालगंधर्व’ नाट्यगृहात या नाटकाचे एकाच दिवशी तीन सलग प्रयोग झाले आणि या घटनेची रंगभूमीवर त्या काळी विशेष नोंद

झाली. नाट्यसंपदा, नाट्यमंदार, गोवा हिंदू असोसिएशन, चंद्रलेखा अशा महत्त्वाच्या नाट्यसंस्थांतून प्रा. तोरडमल यांनी नाट्यसेवा केली. केवळ मराठी रंगभूमीच नव्हे; तर चित्रपटांतूनही त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. शालेय जीवनापासूनच त्यांच्या अभिनय कारकीर्दीला प्रारंभ झाला. नगर येथे त्यांनी महाविद्यालयात प्राध्यापकी केली. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धा गाजवल्या. त्यानंतर त्यांची पावले व्यावसायिक रंगभूमीकडे वळली आणि त्यांनी इतिहास घडवला.

बहुपेडी व्यक्तिमत्त्व

नाटककार, दिग्दर्शक, प्राध्यापक, लेखक, अनुवादक, नाट्यनिर्माता असा त्यांनी लिलया संचार केला. त्यांनी अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या २७ इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठीत अनुवादही केला आहे. तसेच र. धों. कर्वे यांनी लिहिलेल्या ‘बुद्धिप्रामाण्यवाद’ या इंग्रजी लेखसंग्रहाचे मराठी भाषांतर केले. त्याशिवाय ‘तिसरी घंटा’ (आत्मचरित्र), ‘आयुष्य पेलताना’ (रूपांतरित कादंबरी), ‘एक सम्राज्ञी एक सम्राट’ (चरित्रात्मक) अशी लेखनसंपदा त्यांच्या नावावर आहे.

समृद्ध नाट्यसंपदा : गुड बाय डॉक्टर, गोष्ट जन्मांतरीची, काळं बेट लाल बत्ती, तरुण तुर्क म्हातारे अर्क, चांदणे शिंपित जाशी, बेईमान, अखेरचा सवाल, घरात फुलला पारिजात, चाफा बोलेना, म्हातारे अर्क बाईत गर्क, ऋणानुबंध, किनारा, संगीत मत्स्यगंधा, गगनभेदी, गाठ आहे माझ्याशी, गुलमोहोर, झुंज, भोवरा, मगरमिठी, लव्हबर्ड्स, विकत घेतला न्याय, सैनिक नावाचा माणूस, मृगतृष्णा, बाप बिलंदर बेटा कलंदर इत्यादी.

 

अभिनय, लेखन आणि अनुवाद अशा तिन्ही प्रांतात तोरडमल यांनी दिलेले योगदान मोठे आहे. त्यांना मराठी रंगभूमी आणि साहित्य समृद्ध करण्याचा ध्यास होता. ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ नाटकातील त्यांची प्रा. बारटक्के ही भूमिका कायम स्मरणात राहील.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री


अभिनय, निर्मिती, लेखन, दिग्दर्शन अशा अनेक भूमिका समर्थपणे पेलून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांचे आत्मचरित्र ‘तिसरी घंटा’ हा तर रंगभूमीचा जणू ज्ञानकोषच म्हणता येईल.
- राधाकृष्ण विखे-पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा

नाटककार, दिग्दर्शक, प्राध्यापक, लेखक, अनुवादक, नाट्यनिर्माता आणि अभिनेता म्हणून तोरडमल यांनी आपली विशेष ओळख निर्माण केली होती. आपल्या दमदार आणि कसदार अभिनयाचा नाट्य व चित्रपट सृष्टीत स्वतंत्र ठसा उमटविला होता. 
- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री

मधुकर तोरडमल मुंबईमध्ये राज्य नाट्य स्पर्धेसाठी आले तेव्हापासून माझा त्यांच्याशी परिचय होता. प्रत्येक गोष्ट त्यांना नीटनेटकी लागायची, मोकळेपणा हे त्यांचे स्वभाव वैशिष्ट्य होते. 
- जयंत सावरकर, नाट्यसंमेलनाध्यक्ष

मधुकर तोरडमल हा खूप मोठा माणूस होता. ते मुंबईला राज्य नाट्य स्पर्धा करण्यासाठी नगरहून यायचे. त्यांची नाटके मराठी रंगभूमी समृद्ध करण्यासाठीच आली होती, असे मला वाटते.
- गंगाराम गवाणकर, नाटककार

मधुकर तोरडमल हे अतिशय शिस्तशीर व्यक्तिमत्त्व होते. ते उत्तम लेखक व दिग्दर्शक होते. विनोदी नाटकही किती गांर्भीयाने करायला हवे ते त्यांनी दाखवून दिले. त्यांनी रंगभूमीवर शिस्त रुजवली.
- प्रमोद पवार, ज्येष्ठ अभिनेता

Web Title: Veteran artist Madhukar Toddmal passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.