ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचे निधन
By admin | Published: September 19, 2016 06:02 AM2016-09-19T06:02:26+5:302016-09-19T06:02:26+5:30
ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचे हृदयविकाराने शनिवारी रात्री निधन झाले.
मुंबई : ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांचे हृदयविकाराने शनिवारी रात्री निधन झाले. आयुष्यभर संगीतसेवेचा अखंड ध्यास घेतलेल्या नंदू होनप यांची प्राणज्योत एका कार्यक्रमात संगीतसाधना करतानाच मालवली. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने भक्तिसंगीताच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारा संगीतकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. रवींद्र नाट्य मंदिरात शनिवारी रात्री नंदू होनप यांची गाण्यांची मैफील होती. मैफिलीच्या अंतिम चरणी त्यांनी त्यांचे गाजलेले ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी..’ हे गाणे वाजवायला घेतले होते; आणि या गाण्याचा शेवट होत असतानाच ते कोसळले. रविवारी सकाळी दादर येथील त्यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ गायक अजित कडकडे, जयंत ओक, गायिका अनुराधा पौडवाल, नेहा राजपाल आदी मान्यवरांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. नंदू होनप हे भक्तीसंगीताच्या माध्यमातून घराघरांत पोहोचले होते. श्री गुरुदेव दत्ताची गाणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. 'निघालो घेऊन दत्ताची पालखी’, ‘स्वामी कृपा कधी’, ‘अक्कलकोट स्वामींची पालखी’, ‘तूचि आशा श्रीगणेशा’, ‘विठ्ठल बावरा’, ‘गण गण गणात बोते’ अशी अनेक भक्तिगीते त्यांनी संगीतबद्ध केली होती. अजित कडकडे, अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे अशा आघाडीच्या गायकांनी त्यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली ही गाणी गायली. भक्तीगीते आणि अभंगवाणी यावर त्यांची हुकूमत होती. पण त्यासह भारुडे, स्तोत्रे, लावणी, भावगीते असे संगीताचे प्रकारही त्यांनी हाताळले होते. ‘आकाशवाणी’वरील विशेष गीतगंगा यात त्यांनी सहभाग नोंदवला होता. अनेक चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते. मात्र १०० चित्रपटांना संगीत देण्याचे त्यांचे स्वप्न त्यांच्या निधनाने अपूर्ण राहिले. 'विश्वास' हा त्यांनी संगीतबद्ध केलेला अखेरचा चित्रपट ठरला.
नंदू होनप हे व्हायोलिन वादनातही निपुण होते. त्याच्या व्हायोलिनची साथ ‘सावन आया है’, ‘सुनो ना संगे मरमर’, ‘दगाबाज रे’ अशा हिंदी गाण्यांनाही लाभली होती.
>भक्तीसंगीताच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले ज्येष्ठ संगीतकार व व्हायोलिन वादक नंदू होनप यांच्या व्हायोलिन वादनात जादू होती. त्यांनी आपल्या संगीताच्या कारकीर्दीत त्यांच्या संगीत रसिकांना अभंग आणि भजनाचा अजरामर नजराणा दिला होता.
- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री