ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांचे निधन

By Admin | Published: January 19, 2016 11:12 AM2016-01-19T11:12:12+5:302016-01-19T16:32:01+5:30

ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत अरूण टिकेकर यांचे मंगळवारी सकाळी मुंबईतील निधन झाले

Veteran journalist Arun Tikekar dies | ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार अरूण टिकेकर यांचे निधन

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत अरूण टिकेकर यांचे मंगळवारी सकाळी मुंबईत निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने मंगळवारी त्यांची प्रकृती बिघडली आणि सकाळी साडेआठच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत लोकसत्ता या दैनिकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे कल्पक संपादक म्हणून सर्वसामान्य वाचकांना अरुण टिकेकर हे नाव माहित आहे पण याव्यतिरिक्त इंग्रजी साहित्याचे अभ्यासक आणि अध्यापक, तसेच एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते. मुंबई विद्यापीठाच्या इतिहासाचे साक्षीदार असलेले  अरुण टिकेकर यांनी या ग्रंथाचे लेखन केले आहे. एक अभ्यासू पत्रकार याप्रमाणेच ग्रंथप्रेमी अशी ओळख असलेल्या टिकेकर यांच्याकडे पंधरा ते वीस हजार पुस्तकांचा संग्रह होता. तरुण पत्रकार, राजकीय नेत्यांना त्यांनी नेहमीच मार्गदर्शन केले.
टिकेकर हे अतिशय चांगले मित्र आणि मार्गदर्शक होते. एखादी व्यक्ती छोटी असो वा मोठी, त्यांना जर ती व्यक्ती आवडली तर मग ते त्यांच्यांशी कायम संपर्कात असतं, ते संबंध जोपासत असत अशी भावना त्यांच्या निकटवर्तीयांनी व्यक्त केली. 
टिकेकर यांचा 'एकमत पुरस्कार', तसेच ' अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार' देऊन गौरव करण्यात आला होता. 
 
 
टिकेकर यांचे प्रकाशित साहित्य :

- अक्षरनिष्ठांची मांदियाळी-- ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध

- काल मीमांसा

- फास्ट फॉरवर्ड (शरद पवारांच्या मुलाखतींचे आणि भाषणांचे संपादन)
 
- मुक्तानंद : प्रा.श्रीराम पुजारी स्मृतिग्रंथ
 
- रानडे प्रबोधन-पुरुष
- शिखर शिंगणापूरचा श्री शंभूमहादेव
- स्थल काल
 
 
मान्यवरांच्या प्रतिक्रिया : 
 
अरुण टिकेकर यांच्या निधनाबद्दल दैनिक लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांनी शोक व्यक्त केला. ' टिकेकर हे एक व्यासंगी पत्रकार होते. त्यांनी जगभर प्रवास केला होता. लोकमतमध्येही त्यांनी काही काळ काम केले होते. ते कोणत्याही विषयावर लिहू शकायचे, केवळ विपुल वाचनाच्या आधारावर नव्हे तर ब-याच अनुभवातून त्यांचे लेखन कागदावर उतरायचे. त्यांनी कधीच हातचं राखून लेखन केलं नाही, त्यांना जे पटायचं, योग्य वाटायचं ते जरूर लिहीत असतं. त्याच्या निधनामुळे पत्रकारीता क्षेत्राचे मोठे नुकसान झाले' अशी प्रतिक्रिया दिनकर रायकर यांनी व्यक्त केली. 
 
एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांनीही अरुण टिकेकर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. ' आजच्या पत्रकारीतेत ज्या गुणांची वानवा आहे किंवा आवश्यकता आहे, त्या सर्व गुणांनी अरुण टिकेकर संपन्न होते. एवढे व्यासंगी, ज्येष्ठ पत्रकार असूनही ते नेहमीच प्रसिध्दीपासून दूर राहिले', असेही खांडेकर म्हणाले. 
 
टिकेकर गेल्याने माझे वैयक्तिक नुकसान झालं. ते प्रचंड पुस्तकप्रेमी होते. त्यांनी पुस्तकांवरही एक पुस्तक लिहीलं होतं, अशी प्रतिक्रिया व्यक्त करत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी टिकेकर यांना श्रद्धांजली वाहिली. 
 
तर टिकेकर यांच्या निधनाने अभ्यासपूर्ण लेखन करणारा ज्येष्ठ पत्रकार हरवला असे सांगत त्यांच्या निधनामुळे पत्रकार सृष्टीचे मोठे नुकसान झाले अशा भावना अरूण साधू यांनी व्यक्त केल्या. 
 
२१व्या शतकाचा उंबरठा ओलांडण्याच्या संक्रमणावस्थेत साक्षेपी संपादक या नात्याने लोकमत परिवाराचा भाग बनलेल्या टिकेकर यांच्या निधनाबद्दल लोकमत समूहाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी दु:ख व्यक्त केले आहे.तसेच, लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी टिकेकरांच्या निधनाचे वृत्त समजताच परदेशातून शोक संवेदना व्यक्त केल्या. 
 
ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांच्या निधनामुळे पत्रकारितेतील एक पर्व संपल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली. अरुण टिकेकर यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना खा. चव्हाण म्हणाले की, त्यांनी पत्रकार म्हणून कारकीर्द गाजवली. ते एक अभ्यासू, निष्पक्ष व निर्भिड पत्रकार होते. पत्रकारितेतील पुढची पिढी घडविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी नेहमीच समाजाला नवीन काय देता येईल, याचा विचार केला. संपादक म्हणून जबाबदारी पार पडताना त्यांनी अनेक यशस्वी संकल्पना मांडल्या. मुळातच एक व्यासंगी व्यक्तिमत्व असल्याने त्यांची कर्तृत्व चौफेर होते. वैचारिक चळवळीत त्यांचे मोठे योगदान होते. इतिहास, साहित्य व भाषेचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. त्यांच्या निधनामुळे समाजाची मोठी हानी झाली आहे.
 

 

Web Title: Veteran journalist Arun Tikekar dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.