संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील मोठा दुवा निखळला; ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना मान्यवरांनी वाहिली श्रद्धांजली
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 04:39 AM2020-06-17T04:39:57+5:302020-06-17T04:40:15+5:30
संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील शिलेदार, जेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे दादर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन
मुंबई : संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील शिलेदार, जेष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे दादर येथील निवासस्थानी मंगळवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीतल मोठा दुवा निखळला, अशा भावना व्यक्त करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
संघर्षमय प्रवास पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी पत्रकारितेच्या माध्यमातून गरीब, श्रमिक वर्गावरील अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात येऊन झगडणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे गेल्याचे कळले आणि खूप दु:ख झाले. ठाकरे परिवाराशी त्यांचा स्नेह होता. संयुक्त महाराष्ट्र लढा ज्यांनी लढला, त्यासाठी कारावासही भोगला अशा दिनू रणदिवे यांचा संघर्षमय जीवन प्रवास हा पत्रकारितेच्या क्षेत्रातील प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या जाण्याने संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक मोठा दुवा निखळला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
- उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
एक लढवय्या पत्रकार गमावला
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या पूर्वीपासून ते आजपर्यंत अशा एका प्रदीर्घ कालखंडाचे दिनू रणदिवे हे सजग साक्षीदार होते. आपल्या सशक्त लेखणीच्या माध्यमातून त्यांनी गरीब व उपेक्षित वर्गाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. गेल्या सहा दशकांमध्ये रणदिवे यांनी राज्यातील अनेक सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या पत्रकारितेचा इतिहास रणदिवे यांच्या गौरवशाली योगदानाच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण राहील. त्यांच्या निधनामुळे राज्याने एक लढवय्या पत्रकार गमावला आहे.
- भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल
महाराष्ट्र लढवय्या पत्रकाराला मुकला
गोवा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा लढ्यांमध्ये प्रत्यक्षात सहभागी होत आपल्या लिखाणाच्या माध्यमातून हा लढा पेटवत ठेवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार रणदिवे यांच्या निधनाने महाराष्ट्र एका लढवय्या पत्रकाराला मुकला आहे.
- जयंत पाटील, मंत्री,
प्रदेशाध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस
पत्रकारांसाठी होते दीपस्तंभ
ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक रणदिवे यांच्या निधनाने आपण एक ध्येयवादी पत्रकार व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शिलेदार गमावला आहे. रणदिवे यांनी पत्रकारितेत मोलाचे योगदान दिले. गोवा मुक्ती संग्राम तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. पत्रकारांसाठी ते एक दीपस्तंभच होते. त्यांनी दलित, आदिवासी व श्रमिकांच्या प्रश्नांसाठीही नेहमी आवाज उठवला. दिनू रणदिवे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रणदिवे कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे.
- बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री,
अध्यक्ष - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
आंबेडकरी चळवळीने मार्गदर्शक गमावला
दिनू रणदिवे हे पत्रकारितेतील आदर्श व्यक्तिमत्त्व होते. गाढे अभ्यासक, मार्गदर्शक होते. त्यांच्या निधनाने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा ऐतिहासिक साक्षीदार अभ्यासक आणि आंबेडकरी चळवळीचा पाठीराखा हरपला आहे. त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गिरणी कामगारांचे लढे यांचे वार्तांकन केले. त्यांच्या पत्रकारितेचा वसा हा वंचित-शोषित घटकांना, उपेक्षित वर्गाला, श्रमिकांना न्याय मिळवून देणारा होता. माझे नेतृत्व घडविण्यात दिनू रणदिवे यांच्यासारख्या पत्रकारांचा वाटा मोठा आहे. त्यांच्या निधनाने केवळ पत्रकारिता क्षेत्राची हानी झाली नसून आंबेडकरी चळवळीने सच्चा मित्र गमावला आहे.
- रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
बांगलादेश युद्धाचे वार्तांकन करणारे पहिले मराठी पत्रकार‘
संयुक्त महाराष्ट्र पत्रिके’चे संपादक म्हणून दिनू रणदिवे यांनी तुरुंगवास भोगला. बांगलादेश युद्धाचे वार्तांकन करणारे ते पहिले मराठी पत्रकार होते. १९७३ च्या रेल्वे संपातले दिनू रणदिवे यांचे वार्तांकन अजोड होते. त्यांच्या लेखामुळे शिवसेनेच्या पहिल्या हल्ल्याचा अनुभव मला मिळाला. अंतुलेंचा सिमेंट भ्रष्टाचार शौरी यांच्याआधी त्यांनी चव्हाट्यावर आणला.
- निखिल वागळे, ज्येष्ठ पत्रकार