ज्येष्ठ पत्रकार टिकेकर यांचे निधन

By admin | Published: January 20, 2016 03:33 AM2016-01-20T03:33:01+5:302016-01-20T12:37:55+5:30

ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि साहित्यिक डॉ. अरुण टिकेकर यांचे मंगळवारी सकाळी वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले

Veteran journalist Tikekar died | ज्येष्ठ पत्रकार टिकेकर यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार टिकेकर यांचे निधन

Next

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि साहित्यिक डॉ. अरुण टिकेकर यांचे मंगळवारी सकाळी वांद्रे येथील राहत्या घरी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी प्रा. मनीषा टिकेकर, मुलगा आशुतोष, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. टिकेकर यांच्या पार्थिवावर दुपारी शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मागच्या काही दिवसांपासून टिकेकर यांना श्वसनाचा त्रास होता. टिकेकर यांच्या निधनामुळे महाराष्ट्र एका व्यासंगी विचारवंतास मुकला, अशी भावना व्यक्त झाली.
डॉ. टिकेकर यांनी आपली कारकिर्द महाविद्यालयात व्याख्याता म्हणून सुरू केली. लेखन, वाचन, भाषा, संशोधन आणि साहित्याचा गाढा व्यासंग असलेल्या टिकेकरांनी दिल्लीतील यूएस लायब्ररी आॅफ काँग्रेस आॅफिसमध्ये काम केले. त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात ‘टाइम्स’पासून झाली. प्रारंभी तेथे संदर्भ ग्रंथालयात काम केल्यानंतर कालांतराने ते ‘लोकसत्ता’च्या संपादकपदी रुजू झाले. ‘लोकमत’, ‘सकाळ’ या दैनिकांमध्येही त्यांनी संपादकपद भूषवले होते. त्यांचा व लोकमतचा संबंध त्या दोहोंचीही ऊर्जा, प्रतिष्ठा व लोकप्रियता उंचावणारा ठरला, अशी भावना लोकमत मीडियाचे चेअरमन खा. विजय दर्डा यांनी व्यक्त केली. तर लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी टिकेकरांच्या निधनाचे वृत्त समजताच परदेशातून शोक संवेदना व्यक्त केल्या. टिकेकर यांनी मुंबई विद्यापीठाचा रंजक इतिहास लेखणीबद्ध केला आहे. टिकेकर यांची ओळख एक व्यासंगी व मूल्य जोपासणारा प्रामाणिक पत्रकार अशीच राहिली. एकोणीसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाचे अभ्यासक म्हणूनही त्यांचे नाव आदराने घेतले जाते.
टिकेकरांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता. एशियाटिक सोसायटीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिले. राजकारण्यांवर होणाऱ्या टीका-टिप्पणीसंबंधी नियमावली हवी, अशी त्यांची भावना होती. राजकीय नेत्यांवर चुकीच्या पद्धतीने टीका केल्यास कायदेशीर कारवाईसाठी कायदा तयार करावा, असे मत ते आग्रहपूर्वक मांडत असत.

ग्रंथसंपदा :
- अस्वस्थ महाराष्ट्र (खंड २)
- स्थल काल
- ऐसा ज्ञानगुरु
- अक्षरनिष्ठांची मांदियाळी
- ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध
- काल मीमांसा
- फास्ट फॉरवर्ड (शरद पवारांच्या मुलाखतींचे आणि भाषणांचे संपादन)
- मुक्तानंद : प्रा.श्रीराम पुजारी स्मृतिग्रंथ (खंड पाच)
- रानडे प्रबोधन-पुरुष
- शिखर शिंगणापूरचा श्री शंभूमहादेव
- बखर मुंबई विद्यापीठाची
........................
शोकसंदेश
थोर विचारवंत, पत्रकार गमावला
डॉ. अरुण टिकेकर हे व्यासंगी अभ्यासक, इतिहासकार आणि उत्कृष्ट पत्रकार होते. इतिहासाचे ते गाढे अभ्यासक होते व त्यांच्या लिखाणातून त्यांच्या व्यासंगाची तसेच बहुश्रुतपणाची प्रचिति येत असे. टिकेकर यांच्या निधनाने राज्याने थोर विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार गमावला आहे.
- विद्यासागर राव, राज्यपाल
.....................
व्यासंगी अभ्यासक गमाविला
ज्येष्ठ पत्रकार डॉ. अरूण टिकेकर यांच्या निधनाने व्यासंगी पत्रकार आणि माहिती व संशोधनपूर्ण लिखाण करणारा अभ्यासक गमाविला. प्रखर बुद्धिवादाचे पुरस्कर्ते असणारे डॉ. टिकेकर हे चौफेर प्रतिभेचे व्यक्तिमत्व होते. आपल्या सव्यसाची लिखाणाने त्यांनी संपादक पदाला एक उंची प्राप्त करून दिली होती. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या पत्रकारितेतील एक श्रेष्ठ दर्जाचा संपादक गमाविला आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
..................
कार्याची जाणीव कायम राहिल
अरुण टिकेकर यांच्या रुपाने महाराष्ट्राला एक सव्यसाची आणि विचारवंत संपादक मिळाले होते. ‘फास्ट फॉरवर्ड’ या माझ्या संग्रहाच्या निमित्ताने त्यांच्या बरोबर अनेक वेळा सामाजिक, राजकीय, आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा व्हायची. महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेत त्यांनी परिश्रमपूर्वक स्थान मिळवले होते. त्यांनी केलेल्या कार्याची जाणिव पुढील पिढ्यांना सुद्धा राहील.
- शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
.....................
असामान्य प्रतिभेचा विचारवंत
मराठी पत्रकारिता व साहित्य क्षेत्रातील असामान्य प्रतिभा लाभलेले विचारवंत लेखक आपल्यातून निघून गेला आहे. मराठी व इंग्रजी साहित्य यावर टिकेकरांचे विशेष प्रभुत्त्व होते. महाराष्ट्र व मुंबईच्या इतिहासाविषयी त्यांचा गाढा अभ्यास होता. आज टिकेकर या जगात नाहीत, परंतु लढवय्या पत्रकार, संपादक म्हणून ते कायम अजरामर राहतील.
- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
.............
अभ्यासू वृत्तीचा विचारवंत
एक गंभीर व अभ्यासू विचारवंत, सव्यसाची लेखक, 19 व्या शतकाचे गाढे अभ्यासक, निर्भीड पण संयमी संपादक व सारे आयुष्य आपली विद्यार्थीदशा जोपासलेले विद्यार्थी ही अरु ण टिकेकरांची महाराष्ट्रास असलेली ओळख आहे. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स आणि लोकमत या तीनही मोठ्या मराठी दैनिकांचे संपादक राहिल्याचा मान त्यांच्या गाठीशी आहे. ग्रंथकार, ग्रंथालयाचे संचालक आणि अतिशय निर्मळ व स्वच्छ मनाचा माणूस अशीही त्यांची ओळख साऱ्यांना आहे. त्यांचा व लोकमतचा संबंध त्या दोहोंचीही ऊर्जा, प्रतिष्ठा व लोकप्रियता उंचावणारा ठरला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्र एका जाणत्या विचारवंताला मुकला आहे.
- खा. विजय दर्डा
..................................
पत्रकारितेचे मोठे नुकसान
पत्रकारितेच्या बदलत्या स्थित्यंतराचे साक्षीदार असलेले ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांच्या जाण्याने पत्रकारिता क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या जाण्याने मुंबई व महाराष्ट्राच्या इतिहासाचा जाणकार हरपला आहे.
- अरुण साधू, ज्येष्ठ पत्रकार
.............
व्यासंगी पत्रकार
ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर यांनी वेळोवेळी होत असलेल्या सामाजिक बदलांना आपल्या लेखणीतून अधोरेखित केले. पत्रकारितेची मूल्ये जपणारे आणि लेखणीच्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न मांडणारे व्यासंगी पत्रकार हरपले आहेत.
- विनोद तावडे, सांस्कृतिक कार्यमंत्री
...............
निर्भिड, नि:ष्पक्ष पत्रकार
अरुण टिकेकर यांच्या निधनामुळे एक निर्भिड व नि:पक्ष पत्रकार तसेच लोकांशी थेट जुळलेले एक अभ्यासू विचारवंत हरपले आहेत. टिकेकर यांच्या निधनामुळे वैचारिक चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे.
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते विधानसभा
....................

Web Title: Veteran journalist Tikekar died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.