ज्येष्ठ पत्रकार वसुंधरा पेंडसे-नाईक यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2016 03:39 AM2016-07-16T03:39:12+5:302016-07-16T03:39:12+5:30
ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या माजी संचालिका वसुंधरा पेंडसे-नाईक यांचे शुक्रवारी सकाळी दादर येथील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, लेखिका आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या माजी संचालिका वसुंधरा पेंडसे-नाईक यांचे शुक्रवारी सकाळी दादर येथील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांचे वय ७० वर्षे होते. भारतीय क्रिकेट संघाचे माजी कसोटीपटू सुधीर नाईक यांच्या त्या पत्नी होत्या. रविवारी सकाळी ११ वाजता दादर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पती सुधीर नाईक, कन्या राधिका देशपांडे, जावई आशुतोष देशपांडे आणि नात असा परिवार आहे.
वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी संस्कृत हा विषय घेऊन बी.ए. ही पदवी विद्यापीठातून मिळविली होती. विल्सन महाविद्यालयातून एम.ए.चे प्रशिक्षण घेत असतानाच त्यांची संस्कृत भाषा शिकवण्यासाठी नियुक्ती झाली होती. मराठी आणि संस्कृत भाषेच्या त्या गाढ्या अभ्यासक होत्या. नाईक यांनी ‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रात सहसंपादक म्हणून जबाबदारी सांभाळली, तर ‘लोकप्रभा’ साप्ताहिकाच्या कार्यकारी संपादक आणि‘नवशक्ति’च्या संपादक म्हणूनही त्यांनी काम पाहिले. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या पुरवणी विभागाच्या संपादपकपदीही त्या होत्या. अ.भा. मराठी साहित्य परिषद अध्यक्षा, मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा तसेच महाराष्ट्र राज्य मराठी विकास संस्थेच्या तसेच मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या संचालक म्हणूनही त्यांनी अमूल्य योगदान दिले आहे. (प्रतिनिधी)