एन. डी. गेले! जनलढ्याचे न्यायमूर्ती काळाच्या पडद्याआड; गोरगरीब, कष्टकऱ्यांचा आवाज हरपला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2022 07:13 AM2022-01-18T07:13:22+5:302022-01-18T07:14:37+5:30
महाराष्ट्रातील डाव्या आघाडीचा आधार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ, पुरोगामी विचारांचा आजन्म पाठीराखा प्रा. एन. डी. पाटील (९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
कोल्हापूर : गोरगरीब, कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गेली सात दशके रस्त्यांवर संघर्ष करणारा धगधगता क्रांतिसूर्य सोमवारी मावळला. महाराष्ट्रातील डाव्या आघाडीचा आधार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ, पुरोगामी विचारांचा आजन्म पाठीराखा प्रा. एन. डी. पाटील (९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
शुद्ध चारित्र्य, आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याशी बांधिलकी, त्यागी आणि समर्पित जीवनवृत्ती स्वीकारून शेतकरी, कामगार व शोषित जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला, अशीच लोकभावना त्यांच्या निधनानंतर उमटली. अत्यंत निगर्वी स्वभाव समोरच्याला चटकन आपलेसे करण्याची वृत्ती आणि आवाजाचा दरारा ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. त्यांनी आयुष्यभर विज्ञाननिष्ठा जोपासली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे ते अध्यक्षही होते. त्यामुळे मृत्यूनंतरचे कोणतेही कर्मकांड न करता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांची अंत्ययात्राही काढण्यात येणार नाही.