ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांचे निधन
By admin | Published: March 16, 2015 03:42 AM2015-03-16T03:42:53+5:302015-03-16T03:42:53+5:30
ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांचे आज अंधेरी येथील निवासस्थानी निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. महिन्याभरापूर्वी कृष्णा कल्ले यांना
मुंबई : ज्येष्ठ गायिका कृष्णा कल्ले यांचे आज अंधेरी येथील निवासस्थानी निधन झाले. त्या ७४ वर्षांच्या होत्या. महिन्याभरापूर्वी कृष्णा कल्ले यांना पक्षाघाताचा झटका आला होता. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. आठ दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले होते.
कल्ले यांना नुकतेच महाराष्ट्र शासनातर्फे ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले होते. कृष्णा यांचा जन्म १८ डिसेंबर १९४० रोजी मुंबई येथे झाला. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण कानपूर येथे झाले. वडील संगीतप्रेमी असल्याने त्यांच्यावर बालवयातच संगीताचे संस्कार झाले. हिंदीत जवळपास १०० तर मराठीत साधारण २०० गाणी त्यांनी गायली. भजने, गझल, भावगीते, सुगम संगीत, भक्तिगीते त्यांनी गायली आहेत. संगीत क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याने आत्तापर्यंत त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. परिकथेतील राजकुमारा, मन पिसाट माझे अडले रे, मैनाराणी चतुर शहाणी, गोडगोजिरी लाज लाजरीसारखी अनेक गाणी गाजली होती. (प्रतिनिधी)