ज्येष्ठ समाजसेविका मेहरुन्निसा हमीद दलवाई यांचं निधन
By admin | Published: June 8, 2017 02:41 PM2017-06-08T14:41:45+5:302017-06-08T15:22:59+5:30
मुस्लिम समाजसुधारक हमीद दलवाई यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेहरुन्निसा हमीद दलवाई यांचं वृद्धापकाळाने निधन झाले.
Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 8 - पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व हमीद दलवाई यांच्या पत्नी मेहरुन्निसा हमीद दलवाई (वय ८७, रा. कृष्णकुंज सोसायटी, पुलगेट) यांचे वृद्धापकाळाने सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांचे मागे रुबिना व ईला या दोन मुली आहेत. मेहरुन्निसा यांनी मरणोत्तर देहदानाचा निर्णय घेतलेला असल्याने त्यांचे पार्थिव हडपसर येथील साने गुरुजी रुग्णालयाला सुपूर्त करण्यात आले.
मेहरुन्निसा यांचा जन्म १९३० मध्ये झाला. एका सामान्य मुस्लिम कुटुंबातील मेहरुन्निसा यांनी हमीद यांच्याशी विवाहबध्द झाल्यानंतर त्यांच्या विचारांप्रमाणेच आपली वाटचाल केली. हमीद यांचे सर्व सुधारणावादी विचार त्यांनी सामाजिक रोष पत्करुन दैनंदिन जीवनात रुजवले. कस पाहणा-या प्रत्येक संकटसमयी त्या हमीद दलवाई यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. मुस्लिम सत्यशोधक चळवळीमध्ये हमीद दलवाई यांच्या खांद्याला खांदा लावून मेहरुन्निसा यांनी काम केले.
हमीद दलवाई यांच्या पश्चात मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या अध्यक्षा म्हणून अनेक वर्षे काम पाहिले. हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्सिट्यूटच्या त्या संस्थापक अध्यक्ष होत. तलाक मुक्ती मोर्चामध्ये त्यांनी महत्वाची भूमिका निभावली. ‘मी भरून पावले’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. या पुस्तकातून हमीद दलवाई आणि मेहरुन्निसा यांच्या सहजीवनाचे विविध पैलू उलगडले आहेत. मध्यंतरी हमीद दलवाई यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे मरणोत्तर जीवनगौैरव पुरस्कार देण्यात आला.