लोककलावंत कांताबाई सातारकरांपाठोपाठ कन्या अनिता आणि नातवाचंही कोरोनानं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 12:51 PM2021-06-02T12:51:21+5:302021-06-02T12:52:14+5:30
मराठी तमाशाविश्वातील वगसम्राज्ञी अशी ओळख असलेल्या कांताबाई सातारकर यांचं काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये कोरोनानं निधन झालं होतं. आता त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातू अभिजीत यांचंही कोरोनानं निधन झालं आहे.
मराठी तमाशाविश्वातील वगसम्राज्ञी अशी ओळख असलेल्या कांताबाई सातारकर यांचं काही दिवसांपूर्वी संगमनेरमध्ये कोरोनानं निधन झालं होतं. आता त्यांच्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या अनिता आणि नातू अभिजीत यांचंही कोरोनानं निधन झालं आहे. अवघ्या आठ दिवसांत एकाच कुटुंबातील तीन जणांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे.
ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर या तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या मातोश्री होत्या. काही दिवसांपूर्वी खेडकर कुटुंबीयांना कोरोनाची लागण झालेली होती. कुटुंबातील जवळपास ८ सदस्यांना कोरोनाची लागण झाली होती. अशातच कुटुंबातील अनेकजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले होते. परंतु, अवघ्या आठ दिवसांत खेडकर कुटुंबियांनी तीन जणांना गमावलं आहे.
२५ मे रोजी ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचं कोरोनानं निधन झालं होतं. त्यापाठोपाठ त्यांच्या थोरल्या कन्या आणि नातवाचं कोरोनामुळं निधन झालं आहे. तमाशाच्या गौरवशाली परंपरेतील संघर्षाबरोबरच सुवर्णकाळ अनुभवलेल्या कांताबाईंच्या जाण्याने कलाक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यातच एकाच कुटुंबातील तीन सदस्य गमावल्यानं खेडकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
कोण होत्या कांताबाई सातारकर?
गुजरातमधील बडोदा जिल्ह्यातील टिंबा या गावात १९३९ मध्ये कांताबाई यांचा जन्म झाला. त्यांना तमाशाचा कोणताही वारसा नव्हता. पुढे त्यांचे आई-वडील सातारा या मूळगावी आले. तेथे कांताबाई यांना ‘नवझंकार मेळ्यात’ नृत्याची संधी मिळाली आणि त्यांचा कलाप्रवास सुरू झाला. मुंबईत तमाशामहर्षी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात काम करताना त्यांच्यातील कलाकार घडत गेला. खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली. पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक झाली. पती खेडकर यांच्या निधनानंतर कांताबाईंनी स्वतःचा फड उभा केला.
पुरुषी भूमिकाही हुबेहूब वठविल्या
मराठी रंगभूमीवर पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका केल्याची अनेक उदाहरणे आहेत. मात्र, स्त्रीने पुरुषी भूमिका केल्याची उदाहरणे क्वचितच पाहायला मिळतील. कांताबाईंनी वगनाट्यांतून छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या भूमिका इतक्या हुबेहूब वठवल्या की, पुरुष कलाकारांनाही त्या भूमिकांची नक्कल करावी वाटायचे, असा त्यांचा लौकिक होता.