कुलगुरूंनी प्राचार्यांसमोर जोडले हात
By Admin | Published: July 8, 2017 04:26 AM2017-07-08T04:26:50+5:302017-07-08T04:26:50+5:30
आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीतला गोंधळ अजूनही सुरूच आहे. ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीतला गोंधळ अजूनही सुरूच आहे. ३१ जुलैपर्यंत सर्व निकाल जाहीर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी कंबर कसली असून, बैठकांवर बैठकांचे आयोजन सध्या विद्यापीठात सुरू आहे. विद्यापीठात अभ्यास मंडळाच्या झालेल्या बैठकीत कुलगुरूंनी उत्तरपत्रिका तपासणीला वेग यावा म्हणून प्राचार्यांना भावनिक आवाहन केले आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या सूचनेनुसार काम करण्यासाठी प्राचार्यांना समजावून सांगण्यात आले. पण, प्रश्न विचारण्याची संधी दिली नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
जून महिना संपल्यावरही मुंबई विद्यापीठाचे निकाल जाहीर झाले नसल्याने राज्यपालांनी जातीने या प्रकरणात लक्ष घातले. विद्यापीठाचे सर्व निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यासाठी आता मुंबई विद्यापीठ कामाला लागले आहे. शाखानिहाय निकालांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. एकीकडे जोरदार प्रयत्न सुरूअसताना सर्व्हर साथ देत नसल्याचे उघड झाले आहे. मुंबईसह सिंधुदुर्ग रत्नागिरीतील अनेक महाविद्यालयांत सर्व्हरचा गोंधळ उडाल्याची तक्रार प्राचार्यांकडून करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाचे निकाल लवकर जाहीर व्हावेत म्हणून कुलगुरूंच्या संकल्पनेतून आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी यंदापासून सुरू करण्यात आली आहे. पण, ही प्रक्रिया सुरू करतानाच अनेक प्रश्न निर्माण झाले होते. निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने दोनदा राबवावी लागली. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणी उशिरा सुरू झाली. आता त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या करिअरवर होताना दिसत आहे. पण, आता ३१ जुलैपर्यंत निकाल जाहीर करायचे असल्याने सर्वांचीच तारांबळ उडाली आहे.
आॅनलाइन तपासणी चांगल्या पद्धतीने आणि लवकर पूर्ण व्हावी यासाठी मिठीबाई महाविद्यालयाचे प्रा. विनायक दळवी यांची विशेष नियुक्ती केली आहे. दळवी यांनी सध्या या पदाचा कारभार स्वीकारला नसला तरी त्यांनी अप्रत्यक्षरीत्या कामाला सुरुवात केली आहे.
शुक्रवारी झालेल्या अभ्यास मंडळाच्या बैठकीला कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्यासह विनायक दळवी, विविध शाखांचे डीन आणि परीक्षा मंडळाचे विशेष अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आवश्यक त्या सर्व सूचना करण्यात आल्या.
निकाल वेळेत लावावा यासाठी विद्यापीठाने प्राचार्यांची विशेष मदत घेण्यास सुरुवात केली असून, कॉमर्स कॉलेजातील निकालाची जबाबदारी प्राचार्यांनी वाटून दिल्याने निकाल वेळेवर लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील प्राध्यापकांचीही मदत घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पेपर अपलोड होण्यात गोंधळ
३१ जुलैपर्यंत निकाल लावण्यासाठी सर्वच जण सज्ज झाले आहेत. पण, सर्व्हर डाऊन होत असल्याने शुक्रवारी मुंबईसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या महाविद्यालयांना त्रास झाला आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीसाठी ज्या कंपनीला कंत्राट दिले आहे, त्या कंपनीकडून उत्तरपत्रिका अपलोड करण्यास काही समस्या येत आहेत. त्यामुळे रात्रीच उत्तरपत्रिका डाऊनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.