मानधन, प्रवासभत्ता विद्यार्थ्यांसाठी खर्च करणारा कुलगुरू
By Admin | Published: April 30, 2017 03:29 PM2017-04-30T15:29:48+5:302017-04-30T15:29:48+5:30
मराठवाड्यात पडलेला भीषण दुष्काळ, एक- एक रुपयांसाठी तरसणारे विद्यार्थी शिक्षण सोडून जाण्याच्या शक्यतेमुळे त्यांच्यासाठी काही तरी केले पाहिजे
राम शिनगारे
औरंगाबाद, दि. 30 - मराठवाड्यात पडलेला भीषण दुष्काळ, एक- एक रुपयांसाठी तरसणारे विद्यार्थी शिक्षण सोडून जाण्याच्या शक्यतेमुळे त्यांच्यासाठी काही तरी केले पाहिजे. या भावनेतून नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने श्वासही योजना सुरु केली. या योजनेत कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी परिक्षेत्राबाहेरील विविध कार्यक्रमात मिळणारे मानधन, प्रवासभत्ता जमा करण्याचा निर्णय घेतला. याचा परिणाम विद्यापीठातील शेकडो प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी यात हातभार लावत लाखोंचा निधी जमा करत दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना सलग दोन वर्ष मदतीचा हात दिला आहे.
मराठवाड्यात २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत भीषण दुष्काळ पडला होता. याचा फटका सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसत होता. सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देण्याऐवढे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. यासाठी विद्यार्थ्यांना काहीतरी मदत मिळावी या हेतूने विद्यार्थी कल्याण व पुरस्कार योजना (श्वास) सुरु केली. या योजनेंतर्गत ज्या विद्यार्थ्यांना सरकार व विद्यापीठाकडून कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळत नाही. त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला.
या योजनेमध्ये कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राबाहेर आपणाला बोलावण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे मानधन आणि प्रवासभत्ता जमा करण्याचे आदेश दिले. यानुसार २०१५-१६ या वर्षी तब्बल ५ लाख रुपयांच्या जवळपास निधी कुलगुरूंच्या प्रवासभत्ता व मानधनातून जमा झाले. तर विद्यापीठातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी या योजनेला हातभार लावत मुक्तहस्ते निधी दिला. यामुळे ह्यश्वासह्ण योजनेत तब्बल १३ लाख रुपयांचा निधी जमा झाला. यातून ५३९ दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली असल्याची माहिती विद्यापीठाचे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. हीच योजना २०१६-१७ शैक्षणिक वर्षात सुरु ठेवण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांचा प्रवास भत्ता व मानधन आणि इतर स्वंयसेवी संस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत १५० विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात आली असल्याचेही डॉ. दुडूकनाळे म्हणाले.
पदाचे मानधन जमा करण्याची सवय जुनीच
विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नेमणूक झाल्यामुळे अनेक ठिकाणची आमंत्रणे येतात. यातच त्या कार्यक्रमांना जाण्यासाठी विद्यापीठाची गाडी वापरण्यात येते. त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मिळणारे मानधन आणि प्रवासभत्ता यावर आपला हक्क नसतो. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात ह्यश्वासह्ण योजना सुरु करण्यापुर्वी हा निधी विद्यापीठाकडे जमा करण्यात येत होता. योजना सुुरु केल्यानंतर त्यात हा निधी वळती करण्याचे आदेश दिल्याचे डॉ. पंडित विद्यासागर यांनी सांगितले. इथेच नाही तर पुणे विद्यापीठात ह्यबीसीयूडी संचालकह्ण असताना मिळणारा प्रवासभत्ता आणि मानधनसूध्दा त्यावेळी विद्यापीठाकडे जमा केलेले आहे. यामुळे पदाचे मानधन जमा करण्याची ही जूनीच सवय असल्याचेही डॉ. विद्यासागर यांनी सांगितले.
स्वंयसेवी संस्थांकडूनही मिळवली मदत
विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कुलगुरू डॉ. विद्यासारगर यांनी पुण्यासह इतर ठिकाणच्या स्वंयसेवी संस्था, व्यक्तीची मदत घेतली आहे. यात पुण्यातील एक संस्था विद्यापीठाच्या वसतीगृहात राहणाऱ्या १७१ मुलींना दरमहा १ हजार रूपयांची जवेणासाठी आर्थिक मदत देत आहे. साऊथ इंडियन सोसायटीने १२ लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत केली. अधिकाऱ्यांच्या ह्यकॉम्पीटेटर्स फाऊंडेशनह्णने विद्यापीठातील २०० विद्यार्थ्यांना ६ महिने स्पर्धा परीक्षेचे मोफत मार्गदर्शन केले. यात २५ जागा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी लागाणार सर्व खर्च कॉम्पीटेटर्स फाऊडेशननेच उचलला आहे.
कोणतीही गोष्ट स्वत:पासून सुरुवात केल्यानंतर इतरांना सांगता येते. काहीजण त्याचे अनुकरण करतात. कोणत्याही संस्थेच्या प्रमुखांनी असे आदर्श घालून दिल्यास चांगला पायंडा पडण्यास मदत होते. यात मी पुढाकार घेतला. त्याला माझ्या विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिया पाठिंबा दिला. बाहेरुनही काही संस्थांनी मोलाची मदत केली. यातून काही गरजू विद्यार्थ्यांसाठी मदत करता आली. याचे समाधान आहे.
- डॉ. पंडित विद्यासागर, कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड