पीडितेने बलात्कार नाकारूनही शिक्षा
By admin | Published: June 13, 2017 10:42 AM2017-06-13T10:42:56+5:302017-06-13T10:42:56+5:30
बलात्कार प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईने न्यायालयात साक्ष देताना घडलेला प्रकार झालाच नाही, असे सांगितले असताना
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 13 : बलात्कार प्रकरणातील पीडित अल्पवयीन मुलगी आणि तिच्या आईने न्यायालयात साक्ष देताना घडलेला प्रकार झालाच नाही, असे सांगितले असताना पीडित मुलगी, तिला झालेले बाळ आणि बलात्कार करणारा तरुण यांचा डीएनए टेस्टचा अहवाल आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी तरुणाला १० वर्षे सक्तमजुरी आणि ८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
विशेष न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी हा निकाल दिला. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद
केले आहे.
मयूर लालासाहेब शिंदे (वय २२, रा. नेहरूनगर, पिंपरी) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत १५ वर्षीय पीडित मुलीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणात अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील संजय पवार यांनी ४ साक्षीदार तपासले. त्यामध्ये चेतन महिला सेवा मंडळाच्या संचालक महिलेची साक्ष महत्त्वाची ठरली. मार्च २०१५ मध्ये ही घटना घडली. मयूर आणि पीडित मुलीची ओळख झाली. त्यानंतर मयूरने तिला लग्नाचे आमिष दाखविले. त्याच्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी तो या मुलीला भेटण्यास टाळाटाळ करू लागला. ह्यतुझा आणि माझा काही संबंध नाही. मला फोन करत जाऊ नको,ह्ण असे म्हणून मयूर त्या मुलीला टाळत होता. त्यानंतर ती मुलगी ५ महिन्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. त्या वेळी चेतन सेवा महिला मंडळ येथे या मुलीला दाखल करण्यात आले. तिथे तिने मुलाला जन्म दिला.
चेतन सेवा महिला मंडळाच्या संचालिकेने प्रोत्साहन दिल्याने मुलीने याबाबत फिर्याद दिली होती. मात्र, सुनावणीदरम्यान ती आणि तिची आई फितूर झाल्या. सरकार पक्षाने
४ साक्षीदार तपासले.
डीएनए टेस्ट अहवाल आणि सरकारी वकील संजय पवार यांनी उच्च न्यायालयातील विविध न्यायनिवाड्यांचे दिलेले दाखले ग्राह्य धरून न्यायालयाने भारतीय दंडसंहिता कलम ३७६ (बलात्कार) आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमांनुसार ही शिक्षा सुनावली