‘अपुऱ्या सुविधांनीच घेतला बळी’
By admin | Published: October 2, 2016 01:25 AM2016-10-02T01:25:17+5:302016-10-02T01:25:17+5:30
वाडा तालुक्यातील सोनशिव येथे सोमवारी (२६ सप्टेंबर) अल्पशा आजाराने मृत्यू पावलेले आमचे बाळ हे कुपोषित नव्हते तर येथील ग्रामीण रुग्णालयांतील अपुऱ्या सुविधांमुळे त्याच्यावर
वाडा : वाडा तालुक्यातील सोनशिव येथे सोमवारी (२६ सप्टेंबर) अल्पशा आजाराने मृत्यू पावलेले आमचे बाळ हे कुपोषित नव्हते तर येथील ग्रामीण रुग्णालयांतील अपुऱ्या सुविधांमुळे त्याच्यावर तत्काळ उपचार होऊ न शकल्यामुळेच त्याचा बळी गेला असल्याची खंत या बाळाच्या पालकांनी आदिवासी विकासमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांच्याकडे व्यक्त केली.
शुक्रवारी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी सोनशिव येथे जाऊन वेदांतच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. ‘वाडा ग्रामीण रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ असता तर निश्चितच त्याचा जीव वाचला असता. येथील अपुऱ्या सोयींमुळे आमचे बाळ गेले,’ असे महेश मढवी यांनी सवरा यांना सांगितले. (प्रतिनिधी)
- ‘आमच्या नातवावर जी वेळ आली ती इतरांवर येऊ नये यासाठी सरकारी दवाखान्यात सोयी-सुविधा ठेवाव्यात,’ असे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मयत वेदांतचे आजोबा महादू मढवी यांनी या वेळी सांगितले. वेदांतचा मृत्यू हा कुपोषणाने झाला असल्याचा आरोप विरोधी पक्ष कार्यकर्त्यांनी करून, शासन-प्रशासनावर चांगलीच आगपाखड केली.
- वेदांत कुपोषित नव्हताच, पण यापूर्वी तो कधी गंभीर आजारीही नव्हता. पण आज तो आमच्यात नाही हे मानायला मन तयार नाही, असे वेदांतच्या आजी सविता मढवी यांनी सांगितले. दरम्यान, पालघर जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण रुग्णालयांत, प्राथमिक आरोग्य केंद्रांतील रिक्त जागा लवकरच भरल्या जातील तसेच सोयी-सुविधा पुरविण्यास शासन विशेष लक्ष देईल, असे विष्णू सवरा यांनी या वेळी सांगितले.