बँडस्टँडवर सेल्फीच्या नादात तरुणीने गमावला जीव
By admin | Published: May 4, 2017 05:08 AM2017-05-04T05:08:32+5:302017-05-04T05:08:32+5:30
बहिणीसोबत बँडस्टँडवर सेल्फी काढणे तरुणीच्या जिवावर बेतले. मीनाचल दुराई (२१) वर्ष असे मृत तरुणीचे
मुंबई : बहिणीसोबत बँडस्टँडवर सेल्फी काढणे तरुणीच्या जिवावर बेतले. मीनाचल दुराई (२१) वर्ष असे मृत तरुणीचे नाव असून, ती मूळची तामिळनाडूची रहिवासी आहे. मुंबई दर्शनासाठी ती कुटुंबीयांसोबत आली होती. मात्र, हेच दर्शन तिचे अखेरचे ठरल्याने कुटुंबीयांना धक्का बसला आहे.
मूळची तामिळनाडूची रहिवासी असलेली मीनाचल ही आई-वडील आणि बहिणीसोबत पहिल्यांदाच मुंबई दर्शनासाठी आली होती. मीनाचलच्या हट्टामुळे सर्व जण बँडस्टँड पाहायला आले. सोमवारी दुपारी ४च्या सुमारास मीनाचल बहिणीसोबत बँडस्टँडच्या किनाऱ्याजवळ आली. तेथे ती बहिणीसोबत ती सेल्फी काढत होती. त्याच दरम्यान, खडकावरून पाय घसरून ती पाण्यात पडली.
आईवडिलांच्या डोळ्यादेखत ती बुडत होती. तिला वाचवण्यासाठी आईवडिलांनी आरडाओरड केली. ती ऐकताच तेथे फिरायला आलेले इतर पर्यटक धावत आले. मात्र, तोपर्यंत ती खोलवर बुडाली होती.
स्थानिकांच्या मदतीने तिच्या बचावासाठीचे प्रयत्न सुरू झाले. घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनीही घटनास्थळी धाव घेतली. उशिराने तिला बाहेर काढण्यात आले. तिला तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे दाखल करण्यापूर्वीच मीनाचलला मृत घोषित करण्यात आले.
या घटनेमुळे दुराई कुटुंबीयांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा सेल्फीचा नाद चर्चेत आला आहे. त्यामुळे तरुण-तरुणींनी आता तरी जीवघेण्या सेल्फीच्या नादावर आवर घालावा, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
आवाहन झुगारून काढला सेल्फी
गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात बँडस्टँडवर सेल्फी काढत असताना, गोवंडी बैंगनवाडी येथील करन्नुम अन्सारी (१८), अंजुम खान (१७) आणि मुशत्री खान (१८) या तीन मैत्रिणी समुद्रात बुडाल्या. यामध्ये करन्नुमसह तिला वाचविण्यासाठी गेलेल्या रमेश वळूंज (३५) या स्थानिकांनाही जीव गमवावा लागला. त्यामुळे समुद्रकिनारे, चौपाट्यांवर नो सेल्फी झोन घोषित करण्यात आले. मीनाचल उभी असलेल्या ठिकाणीही सेल्फीस मनाई असल्याचे आवाहन करणारा बोर्ड होता. तरीही ती मोह आवरू शकली नाही.