बळीराजाच्या संतापाचा उद्रेक!
By admin | Published: June 2, 2017 04:20 AM2017-06-02T04:20:29+5:302017-06-02T04:20:29+5:30
विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकरी आंदोलनाला पहिल्याच दिवशी हिंसक वळण लागले. आंदोलकांना पांगविण्यासाठी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : विविध मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकरी आंदोलनाला पहिल्याच दिवशी हिंसक वळण लागले. आंदोलकांना पांगविण्यासाठी येवल्यात पोलिसांना गोळीबार करावा लागला. तर औरंगाबादेत व्यापाऱ्यांनी शेतकरी नेत्याला मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलकांनी शहरांकडे जाणारा भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला, तर हजारो लीटर दूध
रस्त्यांवर ओतले. या आंदोलनाचे लोण मुंबई वगळता संपूर्ण राज्यात पोहोचल्याने उद्यापासून भाजीपाला व दुधाची टंचाई निर्माण होऊ शकते.
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरीही संपात सहभागी झाल्याने बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाले. रस्तोरस्ती भाजीपाल्याचे ढीग दिसत होते आणि दुधाचे पाट वाहत होते.
नाशिक जिल्ह्यामध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शेतमालाची वाहतूक करणारी वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर फेकण्यात आल्याने पोलिसांना काही ठिकाणी लाठीमार करावा लागला. त्यामुळे निफाड, नैताळे, लासलगाव,
येवला आदी गावांमध्ये तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. नाशिक-औरंगाबाद महामार्गावर नैताळे रामपूर, गाजरवाडी, सोनेवाडी, श्रीरामनगर येथील शेतकऱ्यांनी सकाळी ८ वाजता डाळिंबी, कांदे, आंबे, बटाटे रस्त्यावर फेकून सरकारविरोधात संताप व्यक्त केला. जमाव नियंत्रणाबाहेर असल्याने राज्य राखीव दलास पाचारण करण्यात आले. शेतकऱ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी लाठीमार करण्यात आला. त्यास प्रत्युत्तर म्हणून शेतकऱ्यांनीही पोलिसांवर तुफान दगडफेक केली. नाशिक, मुंबई व गुजरातकडे जाणारा शेतमाल पूर्णत: बंद केला आहे. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना मोफत दूध देऊन आंदोलकांनी ‘गांधीगिरी’ केली़ संपकरी शेतकऱ्यांनी दूध रस्त्यांवर ओतल्याने रस्त्यावर दुधाचे पाट वाहत होते.
विदर्भातही तीव्र पडसाद
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचे पडसाद अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यात उमटले असून अमरावतीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशव्दारासमोर गुरूवारी दुपारी २ वाजता कांदे, भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकून शेतकऱ्यांनी त्यांचा संताप व्यक्त केला.
काय आहेत मागण्या
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, स्वामिनाथन आयोग लागू करावा आणि शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, या मागण्यांसाठी किसान क्रांती समन्वय समितीने १ जूनपासून शेतकरी संपाची हाक दिली होती. तशी घोषणा बुधवारी पुणतांबा (जि. अहमदनगर) येथे केली होती. नगर, नाशिक, औरंगाबादेतून सुरू झालेल्या या आंदोलनाला बघताबघता राज्यव्यापी स्वरुप प्राप्त झाले.
पुणे मार्केट यार्डात आवक घटली
शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे पुणे येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे गुरुवारी भाजीपाल्याची आवक ४० टक्क्यांनी घटली. त्यामुळे टोमॅटो, भुईमूग, हिरवी मिरची वगळता इतर सर्व फळभाजी व पालेभाज्यांच्या दरात १० ते ३० टक्के वाढ झाली.
शुक्रवारपासून भाजीपाल्याची आवक आणखी घटणार असल्याने भाजीपाल्याचे दर भडकतील, अशी शक्यता यार्डातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. आडते असोसिएशनने शेतकऱ्यांच्या संंपाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मार्केट यार्डात सकाळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिल्हा बँकेच्या कर्ज शाखेला कुलूप
अमळनेर येथे रास्ता रोको करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेच्या कर्ज शाखेत जाऊन तिथे कुलूप ठोकले. पीक कर्ज मिळत नसल्याने हे कुलूप लावण्यात आल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.