हतबल मातेने घेतला आजारी नवजात चिमुकलीचा बळी
By Admin | Published: August 12, 2016 12:05 AM2016-08-12T00:05:44+5:302016-08-12T00:05:44+5:30
दोन महिन्यांच्या चिमुकलीला वेदनातून मुक्त करण्यासाठी चक्क नाल्याच्या पाण्यात बुडवून इहलोकातूनच मुक्त केले.
ऑनलाइन लोकमत,
औरंगाबाद, दि. 12 - जन्मजात आजारी असलेल्या आपल्या पोटच्या मुलीवर पैशांअभावी उपचारही करता येईनात अन् आजारामुळे तिला होणाऱ्या वेदनाही पहावल्या जाईनात, अशा परिस्थितीत सापडलेल्या मातेने अखेर आपल्या दोन महिन्यांच्या चिमुकलीला वेदनातून मुक्त करण्यासाठी चक्क नाल्याच्या पाण्यात बुडवून इहलोकातूनच मुक्त केले. हतबलतेतून केलेले आपले हे निर्दयी कृत्य लपविण्यासाठी मातेने नंतर चिमुकलीच्या अपहरणाचा बनावही केला. गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांमुळे या कृत्याचे बिंग फुटले.
कल्याणी महेश साळुंके (१९, रा, जैतापूर, ता. कन्नड) असे या आरोपी मातेचे नाव आहे. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, कल्याणी हिचे माहेर औरंगाबादेतील बालाजीनगर येथे आहे. ११ जून रोजी घाटीत तिने एका चिमुकलीला जन्म दिला. तेव्हापासून ती माहेरी होती. जन्मताच तिच्या या चिमुकलीला गंभीर आजार असल्याचे निदान झाले. तिच्या डोळ्यातून रक्तस्त्राव होत होता. उपचारासाठी दिशा ठरविण्यासाठी डॉक्टरांनी बाळाचा एमआरआय करण्याचे सांगितले
उपचाराला पैसेही नव्हते...
कल्याणीच्या माहेरची आणि सासरची दोन्हीकडील आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्यामुळे डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एमआरआय करणे, इतर उपचार करणे कल्याणीसाठी अशक्यप्राय बाब होती. कल्याणीने पैशांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्नही केला; परंतु शक्य झाले नाही. पैशाअभावी तिची एमआरआय तपासणी करता आली नव्हती. दोन दिवसांपासून या चिमुकलीची प्रकृती अधिकच खालावली. तिच्या डोळ्यातूनही रक्तस्त्राव सुरू झाला होता.
परिस्थितीने केले हतबल
आपल्या चिमुकलीवर उपचारासाठी पैसेही नाहीत अन् आजारामुळे चिमुकलीला होणाऱ्या वेदनाही पहावल्या जाईनात म्हणून कल्याणी अस्वस्थ झाली होती. हतबल झाली होती. काय करावे, तिला काही सूचेना. शेवटी चिमुकलीला वेदनातून मुक्त करण्यासाठी कल्याणीने चक्क तिला इहलोकातूनच मुक्तता देण्याचा निर्दयी निश्चय केला. गुरुवारी रात्री साडे सात वाजेच्या सुमारास कल्याणीने काळजावर दगड ठेऊन चिमुकलीला घराजवळच असलेल्या नाल्यात नेले. तेथे नाल्याच्या पाण्यातच तिला बुडविली. त्यामुळे क्षणातच चिमुकलीचा अंत झाला. नंतर कॅरीबॅगमध्ये प्रेत टाकून ती कॅरीबॅग नाल्यातच टाकून कल्याणी घरी आली.
दोन तासातच फुटले बिंग
मुलीला संपवून घरी आल्यानंतर कल्याणीला रडू कोसळले. शेजाऱ्यांनी विचारणा केल्यानंतर कुणी तरी आताच आपल्या मुलीला घरातून उचलून पळ काढला, असा बनाव तिने केला. या घटनेची माहिती एका शेजाऱ्याने थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनाच कळविली. आयुक्तांनी तात्काळ गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त खुशालचंद बाहेती व जवाहरनगर पोलिसांना तपासाचे काम सोपविले. पो.नि. मनीष कल्याणकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती जाणून घेतली. त्यानंतर कल्याणीसह तिचे आई-वडील आणि भावाला घेऊन ठाण्यात आले. तेव्हा कल्याणीने सांगितलेल्या माहितीत काही तरी काळेबेरे असल्याचा संशय पोलिसांना आला. मग विश्वासात घेऊन पोलिसांनी कल्याणीला विचारणा केली. अखेर हंबरडा फोडत कल्याणीने आपल्या कृत्याची कबुली दिली. चिमुकलीचा कोठे खून केला आणि प्रेत फेकले, हे घटनास्थळ पोलिसांना तिने दाखविले. शोध घेऊन पोलिसांनी ते प्रेत ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी मातेविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती, असे पोलीस निरीक्षक कल्याणकर यांनी सांगितले.