‘२६/११’तील जखमींना अखेर न्याय!
By admin | Published: July 7, 2014 04:01 AM2014-07-07T04:01:49+5:302014-07-07T04:01:49+5:30
‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यावेळी जिवाची पर्वा न करता अतिरेक्यांशी प्रतिकार करताना जखमी झालेल्या मुंबई पोलीस दलातील १० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शौर्याला अखेर काही प्रमाणात न्याय मिळाला आहे
जमीर काझी, मुंबई
‘२६/११’च्या दहशतवादी हल्ल्यावेळी जिवाची पर्वा न करता अतिरेक्यांशी प्रतिकार करताना जखमी झालेल्या मुंबई पोलीस दलातील १० पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या शौर्याला अखेर काही प्रमाणात न्याय मिळाला आहे. त्यांच्या कामगिरीबद्दल पोलीस महासंचालकांकडून ‘पराक्रम’पदक मंजूर करण्यात आले आहे.
राष्ट्रपतींचे पोलीस शौर्यपदक व महासंचालक सन्मानचिन्ह या दोन पुरस्कारांच्या दरम्यान ‘पराक्रम’पदक खात्यामध्ये महत्त्वाचे मानले जाते. या शूरवीरांचा प्रस्ताव सव्वा वर्षापासून पोलीस मुख्यालयात धूळ खात पडला होता. महासंचालक संजीव दयाळ यांनी नुकतीच या प्रलंबित प्रस्तावाला मंजुरी दिली. पोलीस निरीक्षक - विजय पोवार, हवालदार - मोहन शिंदे, मुरलीधर झोल, नाईक - निवृत्ती गवाणे, प्रवीण सावंत, कॉन्स्टेबल - बंडू मोरे, शंकर पवार, विनय दंडगव्हाळ, शंकर व्हाडे व संजय गोमांसे अशी पदक मिळालेल्यांची नावे आहेत. यापैकी गवाणे हे सेवानिवृत्त झाले आहेत. आतापर्यंत हे पदक ‘२६/११’ प्रकरणी सहपोलीस आयुक्त (गुन्हा अन्वेषण) सदानंद दाते, निरीक्षक विजय शिंदे व दातेचा आर्डली कॉन्स्टेबल सचिन टिळेकर यांना मिळाले आहे.
मुंबई हल्ल्यात अतिरेकी अजमल कसाबसह त्याच्या नऊ साथीदारांचा प्रतिकार करताना अनेक पोलीस अधिकारी, कर्मचारी शहीद तर अनेक गंभीर जखमी झाले. यापैकी तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे, अप्पर आयुक्त अशोक कामटे व निरीक्षक विजय साळसकर व तुकाराम ओंबळे यांना मरणोत्तर अशोकचक्राने तर निरीक्षक शशिकांत शिंदे यांना मरणोत्तर कीर्तिचक्राने सन्मानित केले गेले. तर त्याच वर्षी अन्य ३३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती शौर्यपुरस्कार जाहीर केला. त्यानंतर गेल्या वर्षी १५ आॅगस्टला हॉटेल ताज येथे अतिरेक्यांशी प्रतिकार करणाऱ्या अप्पर आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, वरिष्ठ निरीक्षक दीपक ढोलेंसह सहा जणांना विशेष बाब म्हणून तर गेल्या २६ जानेवारीला अप्पर आयुक्त राजवर्धन यांना केंद्राकडून शौर्यपदक जाहीर करण्यात आले आहे. मात्र कामा हॉस्पिटलमध्ये अतिरेक्यांशी लढणाऱ्या सदानंद दाते यांच्या पथकातील निरीक्षक विजय पोवार, विजय शिंदे, हवालदार मोहन शिंदे व कॉन्स्टेबल सचिन टिळेकर यांच्या प्रस्तावाची फाईल वर्षभरापासून महासंचालक कार्यालयात पडून राहिली आहे. त्यांच्याबरोबर पाठवलेल्या आयपीएस राजवर्धन यांचे नाव मात्र पुरस्कारासाठी केंद्राकडे पाठविण्यात आले.
दरम्यानच्या काळात संदानंद दाते, विजय शिंदे व कॉन्स्टेबल टिळेकर यांना २०१२मध्ये तत्कालीन महासंचालक एस. सुब्रह्मण्यम यांनी ‘पराक्रम’पदक जाहीर केले होते. त्याच धर्तीवर उपरोक्त १० जणांचा प्रस्ताव गेल्या वर्षी
मार्च महिन्यात महासंचालकांकडे पाठवला होता.