पावसाने घेतले मायलेकींसह चार जणांचे बळी
By admin | Published: July 3, 2016 10:06 PM2016-07-03T22:06:37+5:302016-07-03T22:06:37+5:30
चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर खान्देशात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात मायलेकींसह चार जणांचे बळी गेले तर अन्य दोन घटनांमध्ये पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला
ऑनलाइन लोकमत
जळगाव - चार दिवसांच्या प्रतीक्षेनंतर खान्देशात रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसात मायलेकींसह चार जणांचे बळी गेले तर अन्य दोन घटनांमध्ये पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू झाला. यातील एक सेल्फीच्या नादात पाण्यात बुडाला.
भाटपुरा (ता. शिरपूर) शिवारात अचानक वीज कोसळून रामसिंग गंगाराम पावरा (किराडे) (वय २२ रा. कुंबळे वाडा, पो.धानोरा, ता.सेंधवा, जि.बडवानी) हा ठार तर शेतमालक नरेंद्र माळी हे जखमी झाले.
नाल्याला अचानक आलेल्या पुरात उषाबाई वाघ (४२) व मुलगी बबली उर्फ प्रणाली वाघ (१०) या मायलेकी वाहून गेल्या. यात चारजण बचावले आहेत. पुरात तीन बैलही वाहून गेले. ही घटना रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास लासूर (ता. चोपडा) येथे घडली.
घरात खेळत असतांना अंगावर भिंत पडल्याने साहिल बाळू भिल (वय २) या बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी ७.३० वाजता लोणीसीम (ता. पारोळा) येथे घडली.
मोबाईलवर सेल्फी काढण्याच्या नादात पाण्यात बुडून रितेश अशोकराव जडे (वय १८, रा. सर्वोदय कॉलनी, धुळे ) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी लळिंग किल्ला (ता. धुळे) येथे घडली.
पोहण्यास गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू झाला. यात गौरव शीतल भालेराव (इयत्ता ७ वी) आणि राहूल भरत चौधरी (इयत्ता ४ थी, दोघे रा. चोपडा) या बालकांचा समावेश आहे.ही घटना चोपडा दुपारी येथे घडली.