पाण्याने घेतला वरपित्याचा बळी
By admin | Published: April 21, 2016 05:04 AM2016-04-21T05:04:23+5:302016-04-21T05:04:23+5:30
घरी लग्नाची धामधूम सुरू असतानाच वरपित्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी फर्दापूर (ता. सोयगाव) येथील जळगाव- औरंगाबाद महामार्गावर घडली.
फर्दापूर (जि. औरंगाबाद) : घरी लग्नाची धामधूम सुरू असतानाच वरपित्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी फर्दापूर (ता. सोयगाव) येथील जळगाव- औरंगाबाद महामार्गावर घडली. पाणीटंचाई असल्याने वऱ्हाडी मंडळींसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी जात असतानाच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
फर्दापूर येथील कैलास शिवराम दामोदर (४९) यांच्या मुलाचा विवाह बुधवारी दुपारी होता. गावात पाणीटंचाई असल्याने पाण्याची व्यवस्था करण्यासाठी कैलास दामोदर हे आपला भाचा योगेश बावस्कर व पुतण्या किरण यांना दुचाकीवर सोबत घेऊन एका शेतात जात होते. तेवढ्यात फर्दापूर बसस्थानकानजीक त्यांच्या दुचाकीला जळगावकडून औरंगाबादकडे जाणाऱ्या ट्रकने धडक दिली. या अपघातात कैलास दामोदर हे जागीच ठार झाले, तर योगेश व किरण हे दोघे गंभीर जखमी झाले.
उष्माघाताने भिकाऱ्याचा मृत्यू
बुलडाणा : उष्माघातामुळे मलकापूर येथे बुधवारी भिकाऱ्याचा मृत्यू झाला. अशोक भगवान सोनुने असे मृतकाचे नाव आहे. मलकापूर येथील सामान्य रुग्णालयात व नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
बीडमध्ये उष्माघाताचा दुसरा बळी
आष्टी : बीड जिल्ह्यात उष्माघातामुळे साबलखेड (ता. आष्टी) येथील इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने उष्माघाताच्या बळींची संख्या दोनवर गेली आहे. योगीता अशोक देसाई (११) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. योगीताला रविवारी सांयकाळी ताप आला. तिला तात्काळ प्राथमिक उपचारासाठी धानोरा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले; परंतु सोमवारी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. उष्माघाताने तिचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी काढला.
अकोल्यात उष्माघाताचा बळी
यवतमाळ : भर उन्हात हमाली करणाऱ्या व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील अकोला बाजार येथे बुधवारी दुपारी घडली.
रामू महादेव सोनवणे असे मृताचे नाव असून तो सायकल रिक्षाने हमालीचे काम करीत होता. दुपारी तो घरी आल्यानंतर चक्कर येऊन तो कोसळला. शेजाऱ्यांनी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता, वैद्यकीय अधिकारी एम.के. बेग यांनी मृत घोषित केले. (वार्ताहर)