शिवाजी विद्यापीठात ‘व्हिक्टोरिया अ‍ॅमेझोनिका’

By admin | Published: December 20, 2015 12:15 AM2015-12-20T00:15:02+5:302015-12-20T00:15:02+5:30

शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पती अधिविभागामध्ये उमललेले ‘वॉटर लिली’ अर्थात, ‘व्हिक्टोरिया अ‍ॅमेझोनिका’ या प्रजातीचे फूल हे सध्या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.

'Victoria Amazonia' at Shivaji University | शिवाजी विद्यापीठात ‘व्हिक्टोरिया अ‍ॅमेझोनिका’

शिवाजी विद्यापीठात ‘व्हिक्टोरिया अ‍ॅमेझोनिका’

Next

- आदित्य वेल्हाळ,  कोल्हापूर
शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पती अधिविभागामध्ये उमललेले ‘वॉटर लिली’ अर्थात, ‘व्हिक्टोरिया अ‍ॅमेझोनिका’ या प्रजातीचे फूल हे सध्या सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. याचे कारण असे की, जगातील कमळ वर्गात मोडणारे हे सर्वांत मोठे फूल आहे. एरवी अ‍ॅमेझॉन नदीमध्ये आढळणाऱ्या या दुर्मीळ वनस्पतीची विद्यापीठाने केलेली लागवड यशस्वी ठरली आहे.
कोलकाता येथील संशोधकांनी अ‍ॅमेझॉन खोऱ्यातून सर्वप्रथम या फुलाचे बी तेथील बॉटेनिकल गार्डनमध्ये आणले. शिवाजी विद्यापीठाचे डॉ. एस.आर.यादव यांनी या फुलाच्या बियाण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती. मात्र, कोलकाता बॉटेनिकल गार्डनने यास नकार दिला. बंगलोर विद्यापीठाकडे याची रोपे असल्याचे समजल्यानंतर डॉ. यादव यांनी तेथे संपर्क साधला असता, त्या विद्यापीठाने शिवाजी विद्यापीठासाठी या वनस्पतीची पाच रोपे उपलब्ध करून दिली.
डॉ. यादव यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पती विभागाच्या कृत्रिम तलावात ही रोपे लावली. ‘लीड गार्डन वनस्पती संवर्धन’ या कार्यक्रमांतर्गत या वनस्पतीची देखभाल करण्यात आली.
यादव यांच्या मार्गदर्शनाखाली चार वर्षे या वनस्पतीची निगा राखण्यात आली. कोल्हापूरच्या वातावरणात
ही रोपे रुजली आणि ७ डिसेंबरला
या वनस्पतीचे पहिले फूल उमलले. शनिवारी यातील आणखी एक
फूल उमलले आहे. दुसरी दोन
फुले दोन-तीन दिवसांत फुलतील. त्यामुळे हे दुर्मीळ फूल
पाहण्यासाठी पर्यावरणीप्रेमींनी गर्दी केली आहे.

अ‍ॅमेझॉन नदी खोऱ्यात सापडणाऱ्या या फुलाला अमेरिकन शास्त्रज्ञांनी राणी व्हिक्टोरियाच्या सन्मानार्थ ‘व्हिक्टोरिया अ‍ॅमेझोनिका’ हे नाव दिले आहे. या वनस्पतीला अतिशय तीक्ष्ण काटे आहेत. तिच्या पानाचा घेर ३ मीटर, तर देठ ७ ते ८ मीटर लांब आहे. हे फूल सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान उमलते आणि त्यानंतर वातावरणात विशिष्ट प्रकारचा गंध पसरतो. दुसऱ्या दिवशी या फुलाच्या पाकळ्या गुलाबी होतात. त्याचे परागीभवन ‘बीटल’ जातीचे कीटक करतात.

वनस्पतीशास्त्रातील ही एक ऐतिहासिक घटना असून, अधिविभागातील संशोधक व विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे फळ आहे. त्यामुळे हे फूल पर्यावरणप्रेमी लोकांनी जरूर पाहावे.
- डॉ. एस. आर. यादव, विभागप्रमुख

Web Title: 'Victoria Amazonia' at Shivaji University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.