शहरात विजयोत्सव; ‘आयआरबी’ला काळे

By admin | Published: December 24, 2015 01:16 AM2015-12-24T01:16:57+5:302015-12-24T01:21:34+5:30

‘टोलहटाव’साठी शहरांनी कोल्हापूरचा आदर्श घ्यावा टोल रद्दची घोषणा : जल्लोष; साखर-पेढे वाटप

Victory celebrations in the city; 'IRB' is black | शहरात विजयोत्सव; ‘आयआरबी’ला काळे

शहरात विजयोत्सव; ‘आयआरबी’ला काळे

Next

कोल्हापूर : कोल्हापूर शहराचा टोल रद्द करण्याच्या निर्णयानंतर टोलविरोधी कृती समितीसह विविध पक्षांनी शहरात साखर, पेढे वाढून आनंदोत्सव साजरा केला. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शिरोली टोलनाक्यावरील फलकाच्या ‘आयआरबी’ या अक्षरांना काळे फासत जल्लोष साजरा केला. यावेळी शिरोली जकात नाका, शिवाजी चौक, बिंदू चौक, आदी ठिकाणी आनंदोत्सव करण्यात आला. त्यामध्ये महापौर अश्विनी रामाणे व आमदार राजेश क्षीरसागर यांचाही सहभाग होता.
टोल रद्द झाल्याचा आनंद बुधवारी कोल्हापूरकरांच्या जनतेत दिसून आला. टोल रद्दची माहिती दुपारी कोल्हापुरात पोहोचल्यानंतर सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. त्यांनी अक्षरश: आनंदाने जल्लोष साजरा केला. चौकाचौकांत एकमेकाला तसेच वाहनधारकांना साखर आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. या टोलमुक्तीची माहिती मिळताच शिरोली टोलनाक्यावर सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आले. त्यांनी आनंदाच्या भरात विजयाच्या घोषणा दिल्या. तसेच ‘आयआरबी चले जाव’ अशाही घोषणांनी परिसर दुमदुमला. यावेळी फटाक्यांंचीही आतषबाजी करण्यात आली. या आनंदामध्ये महापौर अश्विनी रामाणे याही सहभागी झाल्या होत्या. या जल्लोषात आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह माजी नगरसेवक बाबा पार्टे, बाबा इंदुलकर, अशोक पोवार, दिलीप देसाई, सतीशचंद्र कांबळे, किसन कल्याणकर, जयकुमार शिंदे, दुर्गेश लिंग्रस, सुनील जाधव, आदी सहभागी झाले होते. या आंदोलकांनी रस्त्यावरून जाणारा ट्रक टोल नाक्यामध्ये थांबवून, त्यावर चढून आयआरबी कंपनीच्या शेडवर असणाऱ्या ‘आयआरबी’ अक्षरांना काळे फासले. यावेळी या टोलविरोधी कृती समितीच्या आंदोलकांनी रस्त्यावर नृत्य करून जल्लोष केला.
बिंदू चौकातह भाजप कार्यालयासमोर साखर वाटप
टोल कायमचा हद्दपार करणार असे आश्वासन भाजप सरकारने दिले होते. त्यानुसार मुख्यमंत्री फडणवीस आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे भाजप वतीने अभिनंदन करण्यात आले. भाजपच्या वतीने बिंदू चौकात या टोलमुक्तीचा आनंदोत्सव करताना साखर आणि पेढे वाटून साजरा केला. यावेळी भाजप सरकारच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या. रस्त्यावरून जाणाऱ्या वाहतूकदारांना यावेळी साखर वाटण्यात आली. यावेळी भाजपच्या कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सरचिटणीस संतोष भिवटे, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश जरग, संदीप देसाई, दिलीप मेत्राणी, अ‍ॅड. संपतराव पवार, हेमंत आराध्ये, हर्षद कुंभोजकर, सयाजी आळवेकर, उत्तम बामणे, किरण कुलकर्णी, श्रीकांत घुंटे, सतीश कांबळे, उपस्थित होते. (प्रतिनिधी)


न्यायालयातील याचिका कायम
विधानपरिषेदमध्ये राज्यशासनाने टोल रद्दची घोषणा केली असली तरी या संदर्भात सर्वोच्च न्यायालयातील याचिका कायम राहील, असे जेष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांनी सांगितले. जेष्ठ नेते दिवंगत गोविंदराव पानसरे यांच्या पुढाकाराने पूर्वी उच्च न्यायालयात आणि सध्या सर्वोच्च न्यायालयात टोल विरोधातील याचिका दाखल केली आहे. टोल रद्दच्या निर्णयानंतरही ही याचिका कायम ठेवावी असे पानसरे यांचे मत होते. कारण या याचिकेच्या माध्यमातून टोलमधील अनेक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणणे शक्य आहे. या याचिकेची सुनावणी जानेवारी २0१६ मध्ये आहे, असे त्यांनी सांगितले.


शिवाजी चौकात शिवसेनेतर्फे जल्लोष
शिवाजी चौकातही शिवसेनेतर्फे आनंदोत्सव साजरा केला. यावेळी महापौर अश्विनी रामाणे, आमदार राजेश क्षीरसागर, शहराध्यक्ष शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, प्रा. विजय कुलकर्णी, सुनील जाधव, बाबा पार्टे, धनाजी दळवी, दीपक गौड, रणजित जाधव, आदी सहभागी झाले होते. यावेळी ‘टोल हटाव’च्या घोषणा देण्यात आल्या.



टोल रद्दमुळे आयआरबी कंपनीने यापूर्वी अपुरी ठेवलेली कामे आता कोल्हापूर महानगरपालिकेला पूर्ण करावी लागणार आहेत; पण त्यासाठी हा प्रकल्प महानगरपालिकेकडे हस्तांतर होणे गरजेचे आहे. त्यानंतरच शासन आणि आयआरबी कंपनी यांच्यात ठरलेल्या अटी, नियमांनुसार या प्रकल्पाची अपुरी कामे आता महापालिकेलाच पूर्ण करावी लागणार आहेत. यामध्ये जुना वाशी नाका ते रंकाळा टॉवर यासह काही रस्ते, गटर्स, फुटपाथ आदींचा समावेश आहे. याशिवाय या रस्त्यावर असणाऱ्या स्ट्रीट लाईटच्या बिलाचाही खर्च महापालिकेलाच उचलावा लागणार आहे.
- नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता, कोमनपा


‘टोलहटाव’साठी शहरांनी कोल्हापूरचा आदर्श घ्यावा
कोल्हापूर : राज्यातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुलीतून दिवसाढवळ्या लूटमार सुरू आहे, असा गंभीर आरोप ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. कोल्हापूरचा टोल हद्दपार केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सहकारी मंत्र्यांचे त्यांनी अभिनंदन केले. ‘टोल हटाव’साठी अन्य शहरांनीही कोल्हापूरकरांची प्रेरणा घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रा. पाटील म्हणाले, जनमताचा आदर करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘टोल रद्द’चा घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. पूर्वीच्या सरकारने घेतलेला हेकट स्वभाव सोडून या शासनाने ‘टोल बंद’चा चांगला निर्णय घेतला आहे. ‘टोल रद्द’चे श्रेय कोणा एका व्यक्तीचे नसून सर्व कोल्हापूरकरांचे आहे. टोलच्या आंदोलनात माझ्यासोबत असलेले आणि ५० वर्षांपासूनचे माझे सोबती दिवंगत अ‍ॅड. गोविंद पानसरे ‘टोल बंद’च्या आनंदात नाहीत, त्यांची उणीव तीव्रतेने भासते आहे. म्हणून कोल्हापूरकरांच्या एका डोळ्यात हसू आणि दुसऱ्या डोळ्यात अश्रू आहेत.
शासनाकडे पैसे नाहीत म्हणून ‘बांधा, वापरा, हस्तांतर करा’ हे धोरण आले. मुळात पैसे नाही, असे म्हणणे शासनाची नामुष्की आहे. आजपर्यंत ‘बांधा, वापरा’ इतकेच आम्ही पाहिले आहे. ‘हस्तांतर होत नाही’ हा अनुभव आहे. त्यामुळे शासनाने टोलवसुलीच्या टोळ्यांना आणण्यापेक्षा सरकारनेच यंत्रणा उभारावी. राष्ट्रीय महामार्गावरील टोलच्या माध्यमातून दिवसा-ढवळ्या टाकल्या जात असलेल्या लुटीकडेही गांभीर्याने लक्ष द्यावे. कर्नाटक हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील टोल कंपनी चांगल्या सुविधा पुरवीत आहे. तरीही तेथील टोल कमी होत आहे. याउलट महाराष्ट्रातील टोल वाढतो आहे, हे गंभीर आहे. त्यामुळे टोलच्या विरोधात दंड थोपटण्याची वेळ आली आहे. कृती समितीचा पहिल्यापासूनचा अजेंडा कोल्हापूरसह सर्व अन्यायी टोल बंद करणे, असा आहे. राज्यातील जनतेने कोल्हापूरची प्रेरणा घेऊन संबंधित शहरातील टोलविरोधात आंदोलन सुरू करावे.

Web Title: Victory celebrations in the city; 'IRB' is black

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.