सात उमेदवारांची अनामत जप्त करत विजय

By admin | Published: October 19, 2014 09:28 PM2014-10-19T21:28:15+5:302014-10-19T22:26:41+5:30

राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला चांगलीच धुळ चारली आहे. केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांच्यासह

Victory confiscated by seven candidates | सात उमेदवारांची अनामत जप्त करत विजय

सात उमेदवारांची अनामत जप्त करत विजय

Next

सावंतवाडी : लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाने शिवसेनेला दिलेले एकहाती मताधिक्य विधानसभा निवडणुकीत कायम ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला चांगलीच धुळ चारली आहे. केसरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांच्यासह सात उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करत भाजप व काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवण्यात शिवसेना यशस्वी ठरली.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विनायक राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व नाराज काँॅग्रेसच्या मतदारांनी ८४ हजार मते मिळवून दिली होती. त्यावेळी त्यांना या मतदारसंघातून तब्बल ४२ हजारांचे मताधिक्क्य होते. मात्र, यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेस वगळता सर्व पक्ष सोबत होते. पण विधानसभा निवडणुकीचे चित्र पूर्णत: वेगळे होते. दीपक केसरकर यांनी दोन महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी झालेल्या वादामुळे शिवसेनेत प्रवेश केला होता. तर विधानसभा निवडणुका आघाडी तुटल्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढली तर महायुती तुटल्याने शिवसेना आणि भाजप ही विरोधात लढली होती.
तर मनसेनेही या मतदारसंघात चांगलेच दंड थोपटले होते. त्यामुळे मतांचे विभाजन होऊन विजयी होणारा उमेदवार काहीच मतांनी विजयी होईल, असे चित्र मतदारसंघात होते. १ लाख ४५ हजार ३४८ मतदारांनी आपला हक्क बजावला होता. त्यामुळे वाढीव मतदान हे भाजपच्या पारड्यात जाईल, असे वाटत होते. या मतदारसंघात काँग्रेसने मागील लोकसभा निवडणुकीत ४७ हजार मते घेतली होती. ती मते कायम राहिली तर दीपक केसरकरांना कठीण जाईल, असे वाटत होते. त्यातच भाजपने ही या मतदारसंघात प्रभावी प्रचार यंत्रणा राबवली होती. मनसे उमेदवार परशुराम उपरकर यांना मच्छीमार समाजाने चांगला पाठींबा दिला होता. त्याचा फटकाही सेनेला बसेल, असे वाटत होते. पण आजच्या मतमोजणीत या सर्वांवर पाणी फिरल्याचे दिसून येत होते.
सुरूवातीपासूनच शिवसेना उमेदवार केसरकरांना चांगले मताधिक्य मिळत गेले. हे मताधिक्य शेवटच्या फेरीपर्यंत कमीच झाले नाही. दीपक केसरकर हे शेवटच्या फेरीत ४१,१९२ मतांनी विजयी झाले. त्यांना एकूण ७०,९०२ मते पडली आहेत. या बेरीज वजाबाकीच्या गणितात मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, अखिल भारतीय हिंदू महासभा व अन्य अपक्ष उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. तर काँग्रेस आणि भाजपाला शिवसेनेने जागा दाखवून दिली आहे. कारण मागच्या विधानसभा निवडणुकीत दीपक केसरकर हे काँग्रेसमुळेच निवडून आले असा शिक्का बसलेला होता. तो शिक्काही पुसून काढण्यात केसरकर यशस्वी झाले.
दीपक केसरकरांनी लोकसभा निवडणुकीत दहशतवादाविरोधात लढाई लढत असून त्याला जनतेने साथ द्यावी, या आव्हानाला जनता चांगलीच जागली, असेच म्हणावे लागेल. तसेच मनसे उमेदवार परशुराम उपरकर व भाजप उमेदवार राजन तेली यांना नारायण राणे यांनी छुप्या पद्धतीने पाठविले आहे. यामागे राज्यातील काही नेत्यांचा हात आहे, असे केसरकरांचे भावनिक आवाहनही त्यांना विजयापर्यंत घेऊन जाण्यात यशस्वी ठरले आहे.
दोडामार्गमध्ये शिवसेनेचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले. शिवसेनेत दीपक केसरकरांच्यासोबत आलेले सुरेश दळवी यांनी आयत्यावेळी तिकीटासाठी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. हे दोडामार्गमधील जनतेच्या जिव्हारी लागल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. तसेच तळागाळातील शिवसैनिकांनी महाराष्ट्रात शिवसेनेची सत्ता यावी, म्हणून एक एक मत महत्त्वाचे या भावनेतून केसरकरांना विजयापर्यंत घेऊन गेले आणि लोकसभेतील मताधिक्य विधानसभेतही ठेवले हेच यातून दिसून आले आहे.
कारण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा पहिला काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यानंतर या मतदारसंघात १९९९ सालच्या निवडणुकीत शिवसेनेने शिरकाव केला. २००९ मध्ये या मतदारसंघात राष्ट्रवादी काँॅग्रेसने आपले प्राबल्य ठेवले होते. आता पुन्हा शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केल्याचे दिसून आले. कारण कोकणात १९९९ च्यापूर्वी सतत येथील जनतेने काँग्रेसला साथ दिली होती. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कोकणात सर्व जागा शिवसेना जिंकते पण सावंतवाडीची जागा का जिंकत नाही, असे शल्य त्यावेळी व्यक्त केले होते. हे शल्य अनेक शिवसैनिकांनी उराशी बाळगून हा मतदारसंघ भगवामय करायचा, असा निश्चय केला होता. त्यात त्यांना काही प्रमाणात यश आल्याचे दिसून आले आहे. १९९९ ते २००९ अशी दहा वर्षे शिवसेनेचा आमदार होता. तर २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून लढत असलेल्या केसरकरांनीच शिवसेनेचा पराभव केला होता. आणि आता शिवसेनेच्याच झेड्याखाली विजयश्री खेचून आणली, हेच खरे वैशिष्ट्य ठरले आहे.
या मतदारसंघात केसरकरांचा पाडाव करण्यासाठी राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी लक्ष घातले होते. त्यांनी आपले जुने सहकारी सुरेश दळवी यांच्याबरोबरच माजी राज्यमंत्री प्रविण भोसले यांनाही राष्ट्रवादी समाविष्ट करण्यात यश मिळविले होते. त्याचा कोणताही परिणाम केसरकरांच्या मतांवर झालेला नाही. हेच दिसून आले आहे. वेंगुर्ले येथे कार्यकर्त्यांमध्ये दुफळी निर्माण झाल्यानंतरही तेथील जनतेने केसरकरांना स्वीकारले. तसेच मच्छीमार समाजही केसरकर यांच्यासोबतच राहिल्याचे दिसून आले आहे.
काँग्रेसने बाळा गावडे या नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली. त्यांच्यासाठी काँग्रेस नेते नारायण राणे यांनी चार ते पाच सभा घेऊन कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचे काम केले होते. पण त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. तर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही सावंतवाडीत येत परशुराम उपरकरांसाठी सभा घेतली होती. पण सभेएवढ्या गर्दीचे रुपांतरही मतात झाले नसल्याचे या निकालातून दिसून आले आहे. युवा मतदारही लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही शिवसेनेसोबतच राहिला असून अनेक युवा मतदारांनी काँग्रेसला मतपेटीतून नाकारले आहे.
कारण काँग्रेसचा उमेदवार हा तिन्ही तालु्क्यात पोहोचला नव्हता. तसेच स्थानिक कार्यकर्त्यांवरच काँग्रेसच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असल्याचे दिसून येत होते. म्हणूनच त्यांचे रूपांतर हे मतात झाले नाही. या निवडणुकीत दहशतवादाच्या मुद्यावर केसरकरांनी दोन हात केले आणि हाच मुद्दा शेवटपर्र्यत लावून धरल्याने शिवसेनेचा या निवडणुकीत विजय झाला आहे.

सावंतवाडीत भगव्याचेच राज्य : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर शिवसैनिकांनी वाजतगाजत मिरवणूक काढली. यावेळी येथे पुन्हा भगव्याचेच राज्य निर्माण झाल्याचे दिसून आले.

Web Title: Victory confiscated by seven candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.