हा तर शेतकरी आंदोलनाचा विजय, दीडपट हमीभावाच्या घोषणेवर अजित नवलेंची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 06:51 PM2018-07-04T18:51:16+5:302018-07-04T18:51:38+5:30

जे सरकार सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देता येणार नाही, असे केल्यास बाजारात असंतुलन निर्माण होईल, अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र देत होते, तेच सरकार आज दीडपट हमीभावाची घोषणा करत असेल, तर हा शेतकरी आंदोलनाचा एक प्रकारे विजयच म्हटले पाहिजे.

This is the victory of the farmers' agitation- Ajit Navale | हा तर शेतकरी आंदोलनाचा विजय, दीडपट हमीभावाच्या घोषणेवर अजित नवलेंची प्रतिक्रिया

हा तर शेतकरी आंदोलनाचा विजय, दीडपट हमीभावाच्या घोषणेवर अजित नवलेंची प्रतिक्रिया

Next

मुंबई -  केंद्र सरकारने शेतीमालाला दीडपट हमीभावाची घोषणा केली आहे. जे सरकार सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांना दीडपट हमीभाव देता येणार नाही, असे केल्यास बाजारात असंतुलन निर्माण होईल, अशा प्रकारे प्रतिज्ञापत्र देत होते, तेच सरकार आज दीडपट हमीभावाची घोषणा करत असेल, तर हा शेतकरी आंदोलनाचा एक प्रकारे विजयच म्हटले पाहिजे. किसान सभा शेतीमालाच्या आधारभूत किमतीमध्ये या निमित्ताने करण्यात आलेल्या वाढीचे स्वागत करत आहे, अशी प्रतिक्रिया किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली आहे. 

अजित नवले पुढे म्हणाले, "पूर्वानुभव पाहता हमीभावाच्या घोषणा होतात, प्रत्यक्षात मात्र घोषित केलेल्या दराप्रमाणे शेतीमालाची खरेदी होत नाही. अनेक अटी शर्ती लावून खरेदी करण्याचे टाळण्यात येते. खरेदी यंत्रणा उभी करण्यात दिरंगाई व कुचराई केली जाते. शेतीमाल खरेदीसाठी पुरेशी आर्थिक तरतूद केली जात नाही. परिणामी अशा घोषणा केवळ कागदावर राहतात.  केंद्र सरकारने आज आधारभावामध्ये जाहीर केलेल्या वाढीव दराने, देशभर शेतीमालाची खरेदी होईल यासाठी खरेदी यंत्रणा उभी करावी व अशी खरेदी करता यावी यासाठी आर्थिक तरतूद करावी अशी मागणी किसान सभा करत आहे. 
आधारभूत किमतीमध्ये करण्यात आलेली वाढ उत्पादन खर्चाच्या दीडपट असल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. जाहीर करण्यात आलेली आकडेवारी पाहता उत्पादन खर्च आधार भाव काढण्यासाठी धरण्यात आलेला उत्पादन खर्च हा वास्तव उत्पादन खर्च नसल्याचे उघड होत आहे. 

स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतीमालाचा उत्पादनखर्च काढताना त्यामध्ये बियाणे, खते आदी  आदानांचा खर्च (A2), शेतकरी कुटुंबाची मजुरी (FL) व बँक कर्जावरील व्याज, गुंतवणुकीवरील व्याज व शेत जमिनीचे भाडे अशा सर्व बाबी एकत्रित करून उत्पादन खर्च (C2) काढणे अपेक्षित आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या आधार भावांमध्ये उत्पादन खर्च (C2) या सर्व बाबींचा विचार करून काढण्यात आलेल्या  नाही. केवळा आदानांचा खर्च व मजुरी या दोनच बाबी उत्पादन खर्चात समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत. एक प्रकारे शेतकऱ्यांवर केलेला हा अन्यायच आहे.  

शेतकऱ्यांचे उत्पन्न खऱ्या अर्थानं दुप्पट करण्यासाठी हा अन्याय दूर होण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने शेतीमालाचा रास्त उत्पादन खर्च विचारात घेऊन दीडपट भाव घोषित करावेत व असा दीडपट भाव मिळेल यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद व खरेदी यंत्रणा देशभर उभारावी अशी मागणी किसान सभा करत आहे. 

Web Title: This is the victory of the farmers' agitation- Ajit Navale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.