महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: महामुंबईत युतीचा महाविजय; आघाडीच्या हाती भोपळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 05:37 AM2019-05-24T05:37:50+5:302019-05-24T05:43:51+5:30
महामुंबईत युतीचा विजय झाला असला, तरी या लढाईत मनसे आणि वंचित बहुजन आघाडी निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले.
मुंबई : महामुंबईत युतीचा विजय झाला असला, तरी या लढाईत मनसे आणि वंचित बहुजन आघाडी निष्प्रभ ठरल्याचे दिसून आले. उत्तर मुंबईत भाजपच्या गोपाळ शेट्टी यांनी ७,०६,६७८ मते घेत, मतदारसंघावरील हुकूमत सिद्ध केली. मातोंडकर यांना केवळ २,४१,४३१ मतेच मिळाली. शेट्टी यांनी ४,६५,२४७ इतके मताधिक्य घेत विजय मिळवला. उत्तर पश्चिममध्ये शिवसेनेचे गजानन कीर्तिकर यांनी तब्बल २,६०,३४२ मतांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा पराभव केला. कीर्तिकर यांनी ५,६९,२४९ मते घेतली, तर निरुपम यांना ३,०८,९०७ मते मिळाली.
उत्तर पूर्वमध्ये भाजपच्या मनोज कोटकांनी ५,१४,५९९ मते घेत विजयाची नोंद केली. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांना २,८८,५५५ मते मिळाली. उत्तर मध्य मुंबईत भाजपच्या पूनम महाजन विरुद्ध काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्या लढतीत महाजनांची सरशी झाली आहे. त्यांना ४,८६,६७२ मते मिळाली, तर दत्त यांना ३,५६,६६७ मतेच पडली.
दक्षिण मध्य मुंबईत शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांनी काँग्रेसच्या एकनाथ गायकवाड यांचा १,५२,१३९ मतांनी पराभव केला. शेवाळे यांना ४,२४,९१३ मते मिळाली, तर गायकवाडांनी २,७२,७७४ मते घेतली. दक्षिण मुंबईच्या बहुचर्चित लढतीत शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी ४,२१,९३७ मते घेत विजय मिळवला. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दिग्गज नेते मिलिंद देवरा यांना ३,२१,८७० मतांवर समाधान मानावे लागले.
ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे राजन विचारे हे ४, १२,२५५ मतांनी विजयी झाले. राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांना ३,२९,१८० मते मिळाली. तर राजन विचारे यांना ७,४१,४३५ मते मिळाली. कल्याण मतदारसंघातून शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी २७ व्या फेरीत रात्री १२.३० वाजेपर्यंत ५,४४,३६९ मते घेत ३, ४०,६६७ मतांची आघाडी घेतली. राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना २,०३,७०२ मते मिळाली. शिंदे यांच्या विजयाची औपचारिकताच बाकी आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपचे कपिल पाटील १,५६,३२९ मतांनी विजयी झाले. त्यांना ५,२३,५८३; तर त्यांचे प्रतिस्पर्धी सुरेश टावरे यांना ३,६७,२५४ मते मिळाली. पालघर मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार राजेंद्र गावित ८८,८८३ मतांनी विजयी झाले. त्यांना ५,८0,४७९ तर त्यांचे प्रतिस्पर्धी बविआचे बळीराम जाधव यांना ४,९१,५९६ मते मिळाली. रायगड लोकसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री शिवसेनेचे अनंत गीते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी ३० हजार ९०४ मतांनी पराभव केला.
>वंचित आघाडी तिसरी
सर्व सहा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी तिसऱ्या क्रमांकाची मते घेतली. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या प्रचाराचा फारसा परिणाम झाला नसल्याचे निकालावरून स्पष्ट होते.