विदर्भ आणि मराठवाड्यात अनुदानित सोयाबीनचा तुटवडा !
By admin | Published: June 13, 2016 04:29 AM2016-06-13T04:29:56+5:302016-06-13T04:29:56+5:30
शासनाने अनुदानावर सोयाबीन बियाणे देण्यास सुरुवात केली असली तरी औसा आणि देवणी तालुक्यातील वलांडी येथे हे बियाणे आले, आले म्हणेपर्यंत संपून गेले.
लातूर : दुष्काळामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अनुदानावर सोयाबीन बियाणे देण्यास सुरुवात केली असली तरी औसा आणि देवणी तालुक्यातील वलांडी येथे हे बियाणे आले, आले म्हणेपर्यंत संपून गेले. त्यामुळे केंद्रावर बियाणांसाठी रांगा लावलेल्या शेतकऱ्यांना हात हलवत परतावे लागले़
औसा तालुक्यात चार वर्षांपासून सोयाबीनचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे़ गेल्या वर्षी पेरण्या झाल्या़ पण उत्पादनच झाले नाही. त्यामुळे यंदा घरगुती बियाणेच नाही. परिणामी, शेतकरी सोयाबीनच्या बियाणांच्या शोधात आहेत.
महाबीजने औसा तालुक्याला १५७५ क्विंटल सोयाबीन बियाणे अनुदानावर देण्याचे जाहीर केले़ त्यामुळे २२५० रुपयांची एक बॅग १५०० रुपयांस मिळत आहे़ शुक्रवारपर्यंत ३४७.४० क्विं़ बियाणे आले आणि लगेच संपले देखील. त्यामुळे शेतकरी कृषी कार्यालय गाठत आहेत आणि तेथे अधिकारी त्यांना उत्तरे देता- देता वैतागले आहेत.
देवणी तालुक्यास १०० टन सोयाबीन बियाणे अनुदानावर दिले जाणार असतानाही केवळ १० टनच बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे़ वलांडी येथील लक्ष्मीकांत कृषी केंद्राचे लक्ष्मीकांत बंग म्हणाले, बियाणांची मागणी १०० टनाची होती़ मात्र १० टनच बियाणे आले आहे़ उर्वरित बियाणे सोमवारी उपलब्ध होईल़ (प्रतिनिधी)
अमरावती विभागातही टंचाई : अमरावती विभागात यंदा खरिपाचे क्षेत्र वाढण्याची शक्यता असून, सोयाबीनसह उडीद, मूग आणि तूर या पिकांच्या पेऱ्यात वाढ होणार आहे. तथापि, त्यासाठी आवश्यक असलेल्या बियाण्याची टंचाई शेतकऱ्यांना भासत असल्याचे दिसत आहे. प्रस्तावित आकडेवारीनुसार यंदा विभागात पाच लाख क्विंटलहून अधिक सोयाबीन बियाणे, ४२ हजार क्ंिवटल तूर बियाणे, तर प्रत्येकी आठ हजार क्विंटल उडीद आणि मूग बियाण्याची आवश्यकता आहे. तथापि, मागणीच्या तुलनेत सोयाबीनच्या केवळ १ लाख ८० हजार बियाण्यांचा पुरवठा झाला आहे.