वेगळ्या विदर्भासाठी ‘विदर्भ बंधन’
By admin | Published: August 6, 2014 01:12 AM2014-08-06T01:12:52+5:302014-08-06T01:12:52+5:30
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या ठरावाची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकीच्या आधी व्हावी, अशी अपेक्षा आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पहिला टप्पा ९ आॅगस्टपासून सुरू होत आहे.
जनमंचचे क्रांतिदिनी अभिनव आंदोलन : ‘रेल देखो, बस देखो’
नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या ठरावाची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकीच्या आधी व्हावी, अशी अपेक्षा आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाचा पहिला टप्पा ९ आॅगस्टपासून सुरू होत आहे. या दिवशी विदर्भातील सर्व जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी शांततामय मार्गाने ‘रेल देखो, बस देखो’ हे अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे. यात तीन लाख ‘विदर्भ बंधन’चा धागा प्रवाशांसह उपस्थितांना बांधण्यात येईल, अशी माहिती, जनमंचचे सल्लागार प्रा. शरद पाटील यांनी आज पत्रपरिषदेत दिली.
प्रा. पाटील म्हणाले, केंद्रात सत्ताबदल झाला आहे. नवे सरकार छोट्या राज्यांच्य निर्मितीला अनुकूल आहे. १९९७ मध्ये त्यांनी भुवनेश्वरच्या पक्ष अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठराव देखील केला आहे. त्याची अंमलबजावणी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी व्हावी हा प्रयत्न आहे. यासाठी क्रांतिदिनी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी रेल्वेस्थानक किंवा बसस्थानकांवर हजारोंच्या संख्येने लोकांनी गोळा होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी बस, छोटी वाहने यावर पोस्टर लावण्यात येईल. जनमंचचे प्रतिनिधी ‘स्वतंत्र विदर्भ’ची टोपी, बॅच घालून लोकांना पत्रके वाटतील. सोबतच रेल्वे किंवा बसस्थानकावरील प्रवाशांना व उपस्थितांना ‘विदर्भ बंधन’चा धागा बांधतील. साधारण तीन लाख लोकांना हा धागा बांधला जाईल. याशिवाय पथनाट्य, भजन, कीर्तन, भारुड आदीच्या माध्यमातून स्वतंत्र विदर्भाचा प्रचार करण्यात येईल.
या आंदोलनाला पाठिंबा मिळविण्यासाठी जनमंचच्या चमूने मागील महिन्यात संपूर्ण विदर्भ पिंजून काढला आहे. या लढ्याला प्रत्येक ठिकाणी व्यापक जनसमर्थन आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या आंदोलनातून अपेक्षित परिणाम साधला गेला नाही तर विधानसभेच्या निवडणुकापर्यंत आंदोलनाची व्याप्ती आणि तीव्रता वाढवत नेण्याची रणनीती आखली आहे, असा इशाराही प्रा. पाटील यांनी दिला.
क्रांतिदिनाच्या अभिनव आंदोलनासाठी सर्व विदर्भवादी संघटनांनी पाठिंबा दिला असून, आंदोलन यशस्वी होणार असल्याची माहिती जनमंचचे अध्यक्ष अॅड. अनिल किलोर यांनी दिली. पत्रपरिषदेत, हरीश इथापे, सुरेश शिंदे, अॅड. गोविंदराव भेंडारकर, प्रकाश इटनकर, रामभाऊ आकरे आदी उपस्थित होते.
बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा
प्रा. पाटील म्हणाले, महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची सत्ता असताना शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे जेव्हा जेव्हा विदर्भात आले तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या भाषणात दोन वर्षात विदर्भाचा विकास न झाल्यास स्वतंत्र विदर्भाचा विचार करू, असे म्हटले होते. याला आज १५ वर्षे पूर्ण होत आहेत. विदर्भाची उपेक्षाच सुरू आहे. यामुळे आतातरी बाळासाहेबांची इच्छा पूर्ण करा, असे आवाहनही त्यांनी केले.