विदर्भात संगणकाद्वारे शेती !
By admin | Published: June 9, 2015 03:17 AM2015-06-09T03:17:58+5:302015-06-09T03:17:58+5:30
पिकाला हवे तेव्हा आणि हवे तेवढे पाणी, खताची मात्रा आणि खताची वेळ केवळ एका बटणवर नियंत्रित होत असेल तर... आश्चर्य वाटते ना... पण हे शक्य केले लासिनातील एका शेतकऱ्याने
ज्ञानेश्वर मुंदे, यवतमाळ
पिकाला हवे तेव्हा आणि हवे तेवढे पाणी, खताची मात्रा आणि खताची वेळ केवळ एका बटणवर नियंत्रित होत असेल तर... आश्चर्य वाटते ना... पण हे शक्य केले लासिनातील एका शेतकऱ्याने. संगणकीकृत नियंत्रक आणि सौरऊर्जेद्वारे त्यांनी डाळिंब शेती फुलविली आहे. शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारा हा प्रयोग विदर्भातील एकमेव आहे.
विदर्भातील शेती म्हटली की, सर्वप्रथम कर्जाचा डोंगर आणि आत्महत्या करणारे शेतकरी असेच काहीसे चित्र डोळ्यांपुढे येते. त्यातही यवतमाळ हा जिल्हा शेतकरी आत्महत्यांसाठी कुप्रसिद्ध. अशा या जिल्ह्यातील लासिना येथील हरीश बाळकृष्ण त्रिवेदी यांनी शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. संगणकाद्वारे नियंत्रित होणारी त्यांची शेती इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारी आहे. वेळ, पाणी, खत आणि मनुष्यबळाची बचत करणारे हे तंत्रज्ञान विदर्भात अगदी नवीन आहे. २१ जानेवारी २०१५ रोजी शेतीला संगणकीकृत करण्यास प्रारंभ झाला आणि अवघ्या ५ महिन्यांत म्हणजे १५ मेपासून त्यांच्या शेतात स्वयंचलित पद्धतीने खते आणि पाणी पिकांपर्यंत पोहोचत आहे.
इस्रायली तंत्रज्ञानाचा वापर त्यांनी यासाठी केला आहे. संगणकीकृत नियंत्रकात एक तासापासून ते दोन महिन्यांपर्यंत पाणी आणि खताचा प्रोग्राम फिड करता येतो. विद्राव्य पद्धतीने खत पिकांपर्यंत पोहोचविले जाते. नत्र, स्फुरद आणि पालाश या तीन खतांसाठी वेगवेगळे तीन ड्रम ठेवले आहेत. हे ड्रम एका पाइपच्या माध्यमातून फर्टिगेशन पंपला जोडले आहे. फर्टिगेशन पंप सामू (पीएच) नियंत्रित करून पाणी आणि खत ड्रीपमधून झाडाजवळ जाते. यासाठी केवळ या शेतकऱ्याला एक बटन दाबावे लागते.
या शेतात सौरऊर्जेवरील मोटरपंपही संगणक नियंत्रित आहे. पिकांच्या आवश्यकतेनुसार फिडिंग केलेल्या प्रोग्रामनुसार पाणी आणि खत आवश्यक असेल त्याचवेळेस मोटारपंप सुरू होतो. या स्वयंचलित खते व पाणी नियंत्रण पद्धतीने ७० टक्के खत, ७० टक्के पाणी आणि ८० टक्के मजुरीची बचत होते. सध्या त्यांच्या डाळिंबाच्या शेतीवर केवळ ६ महिला मजूर आणि ३ पुरुषांची मदत घेतली जाते.
ताळमेळ आवश्यक
आधुनिक शेतीसाठी मोठे भांडवल आवश्यक असते. शेतकऱ्यांनी जमाखर्चाचा ताळमेळ लावून शेती करावी. २४ तास परिश्रम करण्याची तयारी असेल तरच शेतीतून भरघोस उत्पादन घेता येते. छोटे-छोटे प्रयोग करून शेतीला प्रगत तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज असल्याचे हरीश त्रिवेदी सांगतात.
पिकांसाठी संगीत थेरपी
हरीश त्रिवेदी पिकांसाठी आता संगीत थेरपीचा वापर करणार आहेत. शेतात वॉटरप्रूफ स्पीकर लावून झाडांना संगीत ऐकविणार आहेत. प्रात:काली वाद्य संगीत, सकाळी भक्ती संगीत, सकाळी ९ ते १२ या वेळात उडत्या चालीची गाणी, दुपारी ४ ते ५ या वेळात बडबडगीते, सायंकाळी शास्त्रीय संगीत वाजविल्यास उत्पादनात ५० टक्केपर्यंत वाढ होते, असे त्रिवेदी यांनी सांगितले.