बदलीसाठी आधी विदर्भात चला !
By admin | Published: May 23, 2015 01:46 AM2015-05-23T01:46:44+5:302015-05-23T01:46:44+5:30
विदर्भ-मराठवाड्यातील वर्षानुवर्षे रिक्त राहणाऱ्या पदांसाठी अधिकाऱ्यांच्या चक्राकार बदल्या करण्यास सुरुवात झाली असून, त्याद्वारे लवकरच अनुशेष भरून निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
चक्राकार पद्धत : रिक्त पदे भरण्यासाठी नवा पॅटर्न
यवतमाळ : विदर्भ-मराठवाड्यातील वर्षानुवर्षे रिक्त राहणाऱ्या पदांसाठी अधिकाऱ्यांच्या चक्राकार बदल्या करण्यास सुरुवात झाली असून, त्याद्वारे लवकरच अनुशेष भरून निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
भारतीय प्रशासकीय सेवा व राज्य लोकसेवा आयोगाच्या अखत्यारीतील अधिकारी विदर्भ-मराठवाड्यात काम करण्यास नेहमीच नाक मुरडतात. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांनाच त्यांची पसंती असते. शासनाकडूनही त्यास फारसा विरोध होताना दिसत नव्हता. त्यामुळे एकतर विदर्भ-मराठवाड्यात बदलीच होत नव्हती किंवा बहुंताश वेळा ती रद्द केली जात होती. पर्यायाने जागा रिक्त राहत होत्या.
मुख्यमंत्र्यांनी मात्र चक्राकार बदल्यांचा पॅटर्न आणला आहे. त्याचा आदेशही ८ मे रोजी सामान्य प्रशासन विभागाने जारी केला. सार्वजनिक बांधकाम खात्यात अधीक्षक अभियंत्याच्या ५४ जागा रिक्त असून, त्यातील सुमारे दोन डझन जागा विदर्भ-मराठवाड्यातील आहेत. लवकरच कार्यकारी अभियंत्यांना पदोन्नतीने अधीक्षक अभियंता बनविले जाणार असून, या रिक्त जागा आधी भरल्या जातील. (प्रतिनिधी)