विदर्भात ग्रा.पं. निवडणुकीत नेत्यांनी राखले गड
By admin | Published: August 7, 2015 01:22 AM2015-08-07T01:22:10+5:302015-08-07T01:22:10+5:30
नागपूर जिल्हातील १२३, तर चंद्रपूर जिल्ह्यातील ६१० ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकांचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला
नागपूर : नागपूर जिल्हातील १२३, तर चंद्रपूर जिल्ह्यातील ६१० ग्रामपंचायतीसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकांचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ५४ ग्रामपंचायतीवर काँग्रेस समर्थित पॅनलने विजय मिळविला, तर भाजपला ४७ ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेसकडे १३, तर शिवसेनेला केवळ ६ ग्रामपंचायती आल्या.
ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे गाव असलेल्या कोराडी येथेही निवडणूक झाली. त्यांनी पूर्ण ताकद या निवडणुकीत लावली. त्यामुळेच तेथे १७ पैकी सर्वच जागांवर भाजपाचा विजय झाला. कळमेश्वरमधील पाचपैकी चार ग्रामपंचायतीवर काँग्रेस उमेदवारांचा विजय झाल्याने आ. सुनील केदार यांनी या भागावर पकड असल्याचे दाखवून दिले. तर विधानसभा निवडणुकीत पराभव होऊनही नव्या दमाने माजी मंत्री अनिल देशमुख यांनी काम केल्याने नरखेड आणि काटोलमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या.
चंद्रपुरात काँग्रेसची सरशी
चंद्रपूर जिल्ह्यातील ६१० ग्रामपंचायतींच्या निकालात अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. जिल्ह्णातील बहुतांश तालुक्यात काँग्रेसने मुसंडी मारली असून भाजपा दुसऱ्या स्थानावर आहे. जिल्ह्यातील चिमूर, कोरपना, बल्लारपूर, चंद्रपूर, पोंभूर्णा, सावली, सिंदेवाही या तालुक्यात काँग्रेसप्रणित पॅनलचा विजय झाला आहे, तर भद्रावती, मूल, राजुरा, ब्रह्मपुरी तालुक्यात भाजपप्रणित पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. वरोरा तालुक्यात शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळाले आहे.
नगरमध्ये मातब्बरांचा प्रभाव कायम
काँग्रेस-राष्ट्रवादीने ग्रामपंचायत निवडणुकीत वर्चस्व कायम ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक तरुणांना मतदारांनी संधी दिली आहे. त्यामुळे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धीसह काही गावात सत्तापरिवर्तन झाले आहे.
सातारा जिल्ह्यात सत्तांतराची लाट!
जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापितांना जबरदस्त ‘दे धक्का’ देत सत्तांतराची लाट उसळल्याचे चित्र मतमोजणीनंतर स्पष्ट झाले. १०० पेक्षाही जास्त गावांमध्ये परिवर्तन झाले आहे.
पनवेलमध्ये शेकापचे वर्चस्व : तालुक्यातील १५ पैकी १० ग्रामपंचायतींवर शेतकरी कामगार पक्षाने वर्चस्व सिद्ध केले.
(प्रतिनिधी)