पेट्रोलियम रिफायनरीसाठी विदर्भ आदर्श ठिकाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 10:40 AM2018-05-04T10:40:07+5:302018-05-04T10:40:14+5:30

लोकमतचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांनी नाणारची रिफायनरी विदर्भात उभारा अशी मागणी केली आहे. तिला समाजाच्या सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे रिफायनरी उभारण्यासाठी विदर्भ हे एक आदर्श ठिकाण आहे.

Vidarbha is the ideal place for petroleum refinery | पेट्रोलियम रिफायनरीसाठी विदर्भ आदर्श ठिकाण

पेट्रोलियम रिफायनरीसाठी विदर्भ आदर्श ठिकाण

googlenewsNext
ठळक मुद्दे३०,००० प्रत्यक्ष तर एक लाख अप्रत्यक्ष रोजगारपेट्रोल, डिझेल, गॅस होणार स्वस्तऔद्योगिकीरणाला मिळणार चालना

सोपान पांढरीपांडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकमतचे अध्यक्ष व माजी खासदार विजय दर्डा यांनी नाणारची रिफायनरी विदर्भात उभारा अशी मागणी केली आहे. तिला समाजाच्या सर्वच स्तरातून पाठिंबा मिळत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे रिफायनरी उभारण्यासाठी विदर्भ हे एक आदर्श ठिकाण आहे. शिवाय क्रूड आॅईलच्या (कच्चे तेल) क्षेत्रात जगात जे बदल झपाट्याने होत आहेत, त्यामुळे विदर्भात रिफायनरी येणे आवश्यक झाले आहे.

व्हेनेझुएलाचा ३०%सवलतीचा प्रस्ताव
सध्या भारतात कच्चे तेल सौदी अरेबियाच्या आरामको या कंपनीकडून व मध्य पूर्वेतील इतर कंपन्यांकडून आयात केले जाते. या सर्व कंपन्यांवर आॅर्गनायझेशन आॅफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज (ओपेक)चे नियंत्रण आहे. सध्या ओपेकचा क्रूड आॅईलचा भाव ६८ ते ७० डॉलर प्रति बॅरल (१६० लिटर ) असा आहे. भारताला दरवर्षी ७,००,००० कोटी रुपयांचे क्रूड आॅईल आयात करावे लागते.
या स्थितीत कालच व्हेनेझुएला या लॅटीन अमेरिकेतील देशाने भारताला ओपेकपेक्षा ३० टक्के स्वस्त दरात म्हणजे ५० डॉलर प्रती बॅरल दराने क्रूड आॅईल देण्याचा प्रस्ताव दिला आहे व त्यावर सरकार विचार करत आहे. व्हेनेझुएलामध्ये क्रूड आॅईलचे समुद्री व भूमिगत साठे असून जगात सर्वात स्वस्त पेट्रोल (३० रु. लिटर) तिथे मिळते. क्रूड आॅईलच्या जागतिक बाजारपेठेवर वर्चस्व मिळवण्यासाठी व्हेनेझुएलाने हा प्रस्ताव भारताला दिला आहे. व्हेनेझुएलाचे क्रूड आॅईल मिळाले तर पेट्रोलचे भाव ८२ रुपयांवरून ५८ ते ६० रुपये लिटरपर्यंत खाली येतील. डिझेल, स्वयंपाकाचा गॅस व विमानाचे इंधन सुद्धा असेच स्वस्त होईल.
विदर्भात रिफायनरी उभारण्याचा निर्णय आज झाला तरी प्रत्यक्षात उत्पादन सुरू करण्यासाठी तिला तीन वर्षे लागतात. साधारणत: ३० दशलक्ष टन क्षमतेच्या रिफायनरीला ६०,००० कोटी खर्च लागतो. विदर्भाच्या या रिफायनरीला क्रूड आॅईलचा पुरवठा करण्यासाठी मुंबई बंदरापासून पाईप लाईन टाकावी लागेल. या पाईप लाईनला साधारणत: १० मीटर रुंद जमीन लागेल. सुदैवाने सध्या मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गाचे काम झपाट्याने सुरू आहे. या महामार्गाच्या बाजूने भूमिगत पाईपलाईन टाकणे सहज शक्य आहे. त्यामुळे रिफायनरी व पाईपलाईनचे काम एकाच वेळी सुरू राहिले तर तीन वर्षात रिफायनरी सुरू होऊ शकते. उमरेड व बुटीबोरीदरम्यान नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग झोनसाठी संपादन केलेली ५००० एकर जमीन सरकारजवळ आहे. ही जमीन समृद्धी महामार्गाजवळ आहे, त्यामुळे रिफायनरी उभारण्यासाठी आदर्श जागा ठरते.

४० जिल्ह्यांचा फायदा
विदर्भात रिफायनरी उभी झाली तर महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड व तेलंगणातील जवळपास ४० जिल्ह्यांना स्वस्त दराने पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, विमानाचे इंधन मिळू शकते. याशिवाय रिफायनरीतून निघणारा स्वस्त पेटकोक मध्य भारतातील १५ सिमेंट इंधन कारखान्यांना पुरविता येईल व त्यामुळे खर्च कमी होईल. विदर्भातील रिफायनरीमुळे ३०,००० प्रत्यक्ष तर एक लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल व औद्योगीकरणालाही चालना मिळेल. सध्या देशात २४५ दशलक्ष टन क्षमतेच्या रिफायनरी आहेत. २०३० पर्यंत ही क्षमता ४३९ दशलक्ष टन करावी लागणार आहे. त्यापैकी ३० दशलक्ष टन क्षमतेची एक रिफायनरी विदर्भात उभारणे आवश्यक आहे. आता प्रतीक्षा आहे ती सरकारच्या निर्णयाची.

Web Title: Vidarbha is the ideal place for petroleum refinery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.