कापसाच्या वाती अन् मका, साेयाबीनची माती; मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात उडाली दाणादाण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 01:55 PM2024-10-21T13:55:36+5:302024-10-21T13:59:00+5:30

शेतशिवारांमध्ये पाणीच पाणी, फळबागांचेही नुकसान

Vidarbha Marathwada Soils of cotton and maize soybeans Due to heavy rains, grain has blown in the district | कापसाच्या वाती अन् मका, साेयाबीनची माती; मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात उडाली दाणादाण

कापसाच्या वाती अन् मका, साेयाबीनची माती; मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात उडाली दाणादाण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यातील विविध भागात चार ते पाच दिवसांपासून परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. शनिवारी रात्री विदर्भ मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे कापूस भिजून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काढून ठेवलेले सोयाबीन व इतर पिकांनाही या पावसाचा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात पावसाचा अक्षरश: कहर केला असून दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चांदवड, देवळा आणि कळवणसह त्र्यंबक, बागलाणमध्ये दाणादाण उडवली आहे.

जळगावला अलर्ट

- जळगाव जिल्ह्यात सोमवारी पुन्हा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाची स्थिती निर्माण झाली असून, आगामी काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे.
- जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत असून, यामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.   

देवळीत गारपिटीमुळे  फळबागांची नासाडी

वर्धा जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे. पपई उन्मळून पडली, केळीच्या बागेचेही नुकसान झाले आहे. शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या परतीच्या पावसासह गारपिटीने देवळी तालुक्यात मोठे नुकसान केले. वर्धा, हिंगणघाट, आर्वी तालुक्यांनाही फटका बसला आहे. 

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कहर

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चांदवड, देवळा आणि कळवणसह त्र्यंबक, बागलाणमध्ये जोरदार पावसाने दाणादाण उडवली. शनिवारी दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजाप्रमाणे रात्री उशिरा पावसाने जोरदार हजेरी लावल्याने अनेक तालुक्यांमध्ये नागरिकांना स्थलांतरित करावे लागले. ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने चांदवडसह देवळा परिसरात रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहताना दिसले. भात, कांदा, द्राक्षासह सोयाबीन आणि मका यांचे यामुळे प्रचंड नुकसान झाले.

अहिल्यानगरमध्ये सततच्या पावसाने पिके सडली

- ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या तोंडातला घास परतीच्या पावसाने हिरावून घेतला आहे. नेवासा आणि कोपरगाव तालुक्यात अनेक ठिकाणी शनिवारी रात्री जोरदार पाऊस झाला. 
- आठ दिवसांत पावसाने तिसऱ्यांदा हजेरी लावत काढणीला आलेल्या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी उन्हाळ कांद्याची रोपे सडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

परभणी जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस

- परभणी शहरासह जिल्ह्यात शनिवारी रात्री विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली.
- यामध्ये अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट सुरू होता. त्यामुळे विविध ठिकाणी नदी-नाल्यासह ओढ्यांना पाणी आल्याने सखल भागात पाणी साचले होते.
- शिवाय अनेक ठिकाणी शेतशिवारात ठेवलेल्या सोयाबीनचेही नुकसान झाले.
- परभणी शहर परिसरात शनिवारी रात्री दीड तासाच्या कालावधीत मुसळधार पाऊस सुरू होता.
- रविवारी सकाळपर्यंत २६.३ मिलिमीटर एवढा पाऊस झाल्याची नोंद महसूल प्रशासनाने घेतली.

नांदेड जिल्ह्यात मुसळधार

पंधरा दिवसांपासून वातावरणातील तापमानात वाढ झाल्यामुळे उकाड्याचाही त्रास सहन करावा लागत होता. असे असताना शनिवारी रात्री नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह तब्बल दोन ते अडीच तास पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक रस्त्यावर पाणी साचले होते, तर काहींच्या घरातही पाणी शिरले. आधीच सोयाबीनचे भाव हे चार हजार रुपयांच्या आत आलेले असताना पावसामुळे काळवंडलेल्या सोयाबीनला आणखी कमी दर मिळतील, अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे.

धरणाचे दरवाजे उघडले, नदीच्या पुरामध्ये एक बेपत्ता

दाताळा (बुलढाणा) :  येथील नळगंगा धरण भरल्याने त्याचे दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे तुडुंब नदीपात्रात पोहण्याचा आनंद घेण्यासाठी दोघांनी नळगंगा नदीच्या पुलावरून पाण्यात उडी मारली; मात्र धीर सुटल्याने एक जण पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. दुसऱ्याला उपचारासाठी बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना शनिवारी सकाळी  घडली. अमर ऊर्फ पिंटू कडू पवार (३५), पंढरी राजाराम इंगळे (५०) या दोघांनी दत्तगुरू मंदिराच्या बाजूला असलेल्या नळगंगा नदीवरील पुलावरून पोहण्यासाठी उड्या मारल्या. पोहताना त्यांचा धीर सुटला. अमर ऊर्फ पिंटू पवार हा पाण्यातून बाहेर आला. तर पंढरी राजाराम इंगळे हा अद्यापपर्यंत दिसला नाही. अमर ऊर्फ पिंटू याला मलकापुरात उपचारासाठी पाठवले.

मराठवाड्यात ४० मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील ४७ मंडळांना परतीच्या पावसाचा तडाखा बसला. शनिवारी रात्री ११ वाजल्यानंतर सुरू झालेल्या पावसाचा मध्यरात्रीपर्यंत जोर कायम होता. विभागात ३१.५ मि. मी. पावसाची नोंद झाली. ४० मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर शहरालगतच्या वरूड काजी आणि पिसादेवी या मंडळांत १२३ मि.मी.पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ४५.१ मि.मी. पावसाची नोंद झाली; तर शहरात ७० मि.मी.पेक्षा अधिक पाऊस बरसला. यामुळे शहरी भागात झाडे उन्मळून पडण्यासह अनेक वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरले. जालना जिल्ह्यातील १०, लातूर १, नांदेड १०, परभणी २ व हिंगोली जिल्ह्यातील २ मंडळांत पावसाने दाणादाण उडविली. विभागात रविवारी सकाळपर्यंत २९.१ मि.मी. पावसाची नोंद झाली. वार्षिक सरासरीच्या तुलनेत विभागात ११३ टक्के पाऊस झाला.

Web Title: Vidarbha Marathwada Soils of cotton and maize soybeans Due to heavy rains, grain has blown in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.