विदर्भात मान्सून झाला सक्रिय
By admin | Published: June 28, 2016 10:08 PM2016-06-28T22:08:01+5:302016-06-28T22:08:01+5:30
उशिरा एन्ट्री करणारा मान्सून अखेर जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगलाच सक्रिय झाला आहे. गेल्या २४ तासात विदर्भातील सर्वच जिल्ह्यात जोराचा पाऊस झाला. नागपुरात
सर्वदूर पाऊस : ४८ तासात मुसळधार
नागपूर : उशिरा एन्ट्री करणारा मान्सून अखेर जूनच्या शेवटच्या आठवड्यात चांगलाच सक्रिय झाला आहे. गेल्या २४ तासात विदर्भातील सर्वच जिल्ह्यात जोराचा पाऊस झाला. नागपुरात सायंकाळी ६ पर्यंत २०.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. येत्या ४८ तासात नागपूरसह विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तसेच बंगालच्या खाडीत हवाई चक्रवात तयार झाला आहे. यामुळे मध्यभारतात सामान्यापेक्षा जास्त पाऊस होण्याची चिन्हे आहेत. विदर्भ, मध्य प्रदेश तसेच छत्तीसगड येथे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ३० जूनपर्यंत ही स्थिती कायम राहील. मंगळवारी सकाळी तसेच सायंकाळी जोराचा पाऊस झाला. त्यामुळे तापमानात मोठी घट झाली. मात्र, आर्द्रतेमुळे दमटपणा कायम होता.
पावसामुळे नागपुरातील कमाल तापमान सामान्यापेक्षा २ अंशांनी कमी होऊन ३१.८ अंशांपर्यंत खाली आले. दिवसभर आकाशात ढगांची गर्दी होती. गेल्या २४ तासात गोंडपिंपरी येथे १२०, कोरपन १००, सिरोंचा ६०, वर्धा ५४.३, राळेगाव ५०, हिंगणघाट, देवळी, गडचिरोली, कारंजालाड येथे प्रत्येकी ४० मि.मी. पावसाची नोंद झाली. चंद्रपूर येथे १९.६, ब्रम्हपुरी १५, अमरावती १०.२, यवतमाळ ९.४, अकोला १.२ मि.मी. पावसाची नोंद झाली.