मॉन्सूनची विदर्भ - मराठवाड्यापर्यंत जोरदार मुसंडी; मुसळधार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 07:06 PM2020-06-12T19:06:53+5:302020-06-12T19:11:54+5:30
मॉन्सून पुढील 48 तासांत उर्वरीत महाराष्ट व्यापणार
पुणे : मॉन्सूनने आगेकुच सुरु ठेवली असून त्याने आता विदर्भ आणि मराठवाड्यापर्यंत मुसंडी मारली आहे. येत्या 24 तासांत मराठवाडा आणि विदर्भात मुसळ्धार पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. महाराष्ट्राबरोबरच आंध्रप्रदेश, मेघालय, कर्नाटक याठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शुक्रवारी सायंकाळी सुटलेल्या थंडगार हवेमुळे पावसाची शक्यता निर्माण झाली होती. मात्र पावसाने पुणेकरांना हुलकावणी दिल्याचे दिसून आले.
गुरुवारी मॉन्सुन महाराष्ट्रात दाखल झाला. त्यानंतर संपूर्ण गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयाच्या काही भागांत पाऊस झाला. मॉन्सुनच्या पुढील प्रवासासाठी अनुकूल हवामान असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले आहे. आंध्रप्रदेश, ओडिसाच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे येत्या 24 तासांत गोवा, कोकणच्या किनारपट्टीवर जोरदार वारे व मुसळधार पाऊस पडेल. त्याचा प्रभाव पुढे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा याठिकाणी दिसून येईल.
मंगळवारी मॉन्सूनने बंगालच्या उपसागरातील आणखी काही ठिकाणी पुढे वाटचाल केली. बुधवारपासून राज्यात मॉन्सून सक्रिय होण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर १४ अथवा १५ जूनपर्यंत मॉन्सून वेगाने वाटचाल करीत संपूर्ण राज्य व्यापण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात १२ किंवा १३ जून, मुंबईत १३ जूनपर्यंत मॉन्सून दाखलहोण्याची शक्यता आहे. कोकणात १२, १३ व १४ जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता असून तसा इशारा देण्यात आला आहे. राज्यात १४ जूननंतर मॉन्सून अधिक सक्रिय होण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने जाहीर केलेल्या मॉन्सूनच्या नव्यातारखांनुसार गोव्यात मॉन्सूनचे आगमन ५ जून रोजी आहे. यंदा त्याला महाराष्ट्रात थोडा उशीर झाला असून, संपूर्ण महाराष्ट्र मॉन्सून १५ जूनपर्यंत व्यापतो.मॉन्सूनचे आगमन झाल्यानंतर तो वेगाने वाटचाल करणार असून, १५जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता आहे. राज्यात १२जूनपासून सर्वत्र चांगला पाऊस सुरु होण्याची शक्यता असून, पुणे जिल्हा व नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचाइशारा हवामान विभागाने दिला आहे.
अरबी समुद्रावरुन प्रवास करणाऱ्या नैॠत्य मॉन्सुनसाठी सध्याची परिस्थिती योग्य आहे. तो पुढील 48 तासांत उर्वरीत महाराष्ट व्यापणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.