‘विदर्भ मुक्ती’ होणारच
By Admin | Published: September 22, 2014 12:58 AM2014-09-22T00:58:13+5:302014-09-22T00:58:13+5:30
वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘जनमंच’ संघटनेच्या पुढाकाराने आयोजित विदर्भ मुक्ती यात्रेचा रविवारी दीक्षाभूमी येथे समारोप झाला. २० तारखेला बुलडाणा येथील सिंदखेड राजा येथून
विदर्भवाद्यांचा इशारा : विरोधकांना ‘सळो की पळो’ करणार
नागपूर : वेगळ्या विदर्भाचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘जनमंच’ संघटनेच्या पुढाकाराने आयोजित विदर्भ मुक्ती यात्रेचा रविवारी दीक्षाभूमी येथे समारोप झाला. २० तारखेला बुलडाणा येथील सिंदखेड राजा येथून या यात्रेला सुरुवात झाली होती. या यात्रेच्या समारोपप्रसंगी मोठ्या प्रमाणावर विदर्भवादी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. येत्या विधानसभा निवडणुकांदरम्यान विदर्भ हाच प्रचाराचा मुद्दा असला पाहिजे. विदर्भ विरोधक पक्ष व नेत्यांना विदर्भवादी जनता व कार्यकर्ते सळो की पळो करून सोडतील, असा इशाराच यावेळी देण्यात आला. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ही यात्रा राजकीय पक्षांसाठी इशाराच मानण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या विदर्भ मुक्ती यात्रेला विशेष महत्त्व आले होते. जिजाऊंचे जन्मस्थान असलेल्या सिंदखेडराजा येथून या यात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर ठिकठिकाणच्या टप्प्यांवर विदर्भातील निरनिराळ्या जिल्ह्यातून चारचाकी गाड्या व कार्यकर्ते या यात्रेत सहभागी होत गेले. समारोपप्रसंगी दीक्षाभूमीजवळ मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती.
समारोप कार्यक्रमात जनमंचचे अध्यक्ष अॅड.अनिल किलोर, जनमंचचे मार्गदर्शक चंद्रकांत वानखडे व प्रा.शरद पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. जो पक्ष विदर्भाच्या मुद्याला गंभीरतेने घेणार नाही त्याला निवडणुकांत जनतेचा रोष पत्करावा लागेल. जनतेत यावरून एकजूट दिसून येत आहे. वेगळ्या विदर्भाबाबत नेमकी काय भूमिका राहील हे निवडणुकांदरम्यान पक्षांनी स्पष्ट करावे, असे आवाहन जनमंचचे अध्यक्ष अॅड. किलोर यांनी केले.
वेगळ्या विदर्भासाठी आवाज उंच करताना त्याला जनतेची किती साथ आहे हे पाहणेदेखील आवश्यक आहे. विदर्भ मुक्ती यात्रेदरम्यान वेगळ्या विदर्भाबाबत जनतेच्या सकारात्मक भावना सगळीकडेच पहायला मिळाल्या. विझलेल्या आंदोलनाचे निखारे पेटविण्यासाठी जनतेचीच ताकद मिळणार आहे, असे मत चंद्रकांत वानखडे यांनी व्यक्त केले. येत्या निवडणुकांदरम्यान जनमंचची नेमकी भूमिका काय राहील यासंदर्भात या आठवड्यात घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
गाजर नको, अंमलबजावणी हवी
निवडणुका पाहता मतं मिळविण्यासाठी अनेक नेते वेगळ््या विदर्भाला समर्थन करतील. परंतु आता जनता भूलथापांना बळी पडणार नाही. आता जनतेला वेगळ््या विदर्भाचे गाजर नको, तर अंमलबजावणीच्या वेळापत्रकासह ठोस आश्वासन हवे अशी मागणी प्रा.शरद पाटील यांनी केली.
सख्खा भाऊ जरी वेगळ््या विदर्भाचा विरोधक असेल तर त्यालादेखील मत देऊ नका असे आवाहन त्यांनी केले.
वाडीत विदर्भाचा जागर
विदर्भ मुक्ती यात्रेचे वाडी येथे रविवारी स्वागत करण्यात आले. यावेळी ‘जय विदर्भ’च्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. अमरावती- नागपूर या महामार्गाने ही यात्रा रविवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास वाडी येथे पोहोचली. येथे यात्रेतील सर्व विदर्भवाद्यांचे स्वागत करण्यात आले. ‘जय विदर्भ’, ‘विदर्भ वेगळा झालाच पाहिजे’ या घोषणांनी परिसर दणाणला होता. (प्रतिनिधी)
उपराजधानीत उस्फूर्त स्वागत
२० तारखेला सिंदखेडराजा येथून निघालेली ही विदर्भ मुक्ती यात्रा चिखली, खामगाव, अकोला, मूर्तिजापूर, अमरावती, मोझरी, तळेगाव, कारंजा, कोंढाळी, गोंडखैरी, वाडी मार्गे रविवारी उपराजधानीत दाखल झाली. यावेळी दोनशेहून अधिक चारचाकी गाड्या, हजारो कार्यकर्ते यांचा यात समावेश होता. वाडी येथून शेकडो दुचाकीदेखील यात सहभागी झाल्या. वेगळ््या विदर्भाच्या घोषणांनी उपराजधानीतील रस्ते दणाणून निघाले. व्हेरायटी चौक, लोकमत चौक, रहाटे कॉलनी मार्गे या यात्रेचा पवित्र दीक्षाभूमी येथे समारोप झाला. व्हेरायटी चौक येथील महात्मा गांधी तसेच दीक्षाभूमी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ््याला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी जनमंचसमवेत ‘विदर्भ कनेक्ट’, नवराज्य निर्माण संघटना, विदर्भ राज्य आंदोलन समिती या इतर विदर्भवादी संघटनांचे कार्यकर्तेदेखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.