विदर्भासाठी राजकीय शक्ती वाढवण्याची गरज
By admin | Published: January 25, 2015 12:49 AM2015-01-25T00:49:59+5:302015-01-25T00:49:59+5:30
विदर्भात जिंकून मुंबईवर राज्य करता येते, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसने आजवर हेच केले असून भाजपही तेच करीत आहे. विदर्भाच्या भरवशावर जिंकून राज्यात आणि दिल्लीत सत्ता
विदर्भ कनेक्ट : श्रीहरी अणे यांचे प्रतिपादन
नागपूर : विदर्भात जिंकून मुंबईवर राज्य करता येते, ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसने आजवर हेच केले असून भाजपही तेच करीत आहे. विदर्भाच्या भरवशावर जिंकून राज्यात आणि दिल्लीत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पाहणारे राजकीय पक्ष विदर्भाचे स्वतंत्र राज्य कधीच होऊ देणार नाही. त्यामुळे आता आपली शक्ती वाढवण्याची गरज आहे. राजकीय पक्षांना भीती वाटेल तेव्हाच आपली दखल घेतली जाईल. त्यामुळे आता विदर्भासाठी राजकीय शक्ती निर्माण करण्याची गरज असून भविष्यात ‘विदर्भ कनेक्ट’ हा राजकीय पर्याय म्हणून समोर येऊ शकतो, असे विदर्भ कनेक्टचे संस्थापक अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. श्रीहरी अणे यांनी येथे संकेत दिले.
‘विदर्भ कनेक्ट’तर्फे शनिवारी रविभवन येथे विदर्भस्तरीय कार्यकर्ता कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यवेळी ते बोलत होते. याप्रसंगी अॅड. फिरदोस मिर्झा, ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. ‘विदर्भाच्या संघर्षाचा इतिहास व मागणी’ या विषयावर मार्गदर्शन करता अॅड. श्रीहरी अणे म्हणाले, विदर्भाबाबत अनेक आरोप केले जातात. मराठी भाषेच्या अस्मितेविषयी बोलले जाते. परंतु या चुकीच्या समजुती आहेत. त्याला बळी पडण्याची गरज नाही. प्रत्येक आयोगाने विदर्भ राज्य सक्षम असल्याचे म्हटले आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही विदर्भासाठी नसून ती मुंबई गुजरातमध्ये सामील होऊ नये यासाठी होती. विदर्भ महाराष्ट्रात सामील करताना नागपूर करार करण्यात आला. पुढे त्याला कायद्याचे स्वरूप प्रदान करण्यात आले. त्या करारानुसार विदर्भाला लोकसंख्येप्रमाणे २२ टक्के अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणे, शिक्षण, नोकरीमध्ये सुद्धा २२ टक्केची तरतूद होती. परंतु हा करार कधीच पाळला गेला नाही. मागील तीन वर्षांची आकडेवारी सादर करीत अणे यांनी सांगितले की, मागील तीन वर्षात एकट्या पुणे विभागामध्ये ५२.२ टक्के नोकरी देण्यात आली. त्यावेळी नागपूर व अमरावती विभाग मिळून नोकरीचे प्रमाण केवळ २.५ टक्के होते. १९४७ ते ८० पर्यंत विदर्भाचा विकास झालाच नाही. विदर्भ राज्य हे सरप्लस होते. परंतु पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांमुळे तो आज मागे पडला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी विदर्भाचा निधी विदर्भात कधीच खर्च होऊ दिला नाही. त्यांनी विदर्भाच्या निधीची चोरी केली, असा स्पष्ट आरोपही त्यांनी केला. यातून विदर्भाचा अनुशेष वाढत गेला. अनुशेषाचा अनुशेष निर्माण झाला. कायद्यात तरतूद करूनही नेत्यांनी विदर्भाेचा विकास केला नाही. परंतु आता तर कायद्याच्या चौकटीत राहून सुद्धा विदर्भाचा विकास शक्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी विदर्भात सातत्याने होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल अॅड. फिरदोस मिर्झा यांनी महत्त्वपूर्ण आकडेवारी व कारणांचे शास्त्रोक्त पद्धतीने मार्गदर्शन केले. चंद्रकांत वानखेडे यांनी विदर्भ आंदोलनाची तीव्रता व दिशा आणि नितीन रोंघे यांनी विदर्भाची आर्थिक सक्षमता यावर प्रकाश टाकला. यावेळी अॅड. अणे यांनी कार्यकर्त्यांना विदर्भाची शपथ दिली. कार्यशाळेला अॅड. नीरज खांदेवाले, अॅड. रवि संन्याल, अॅड. स्मिता सिंगलकर, अॅड. शैलेंद्र हरोडे आदींसह विदर्भातील सर्व जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विदर्भ कनेक्टचे विदर्भ अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ यांनी प्रास्ताविक केले. संदेश सिंगलकर यांनी संचालन केले. दिनेश नायडू यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
विदर्भासाठी आत्मदहन करणार
येत्या १५ आॅगस्टपर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्य स्थापन न झाल्यास शहीद गोवारी स्मारकाजवळ आपण आत्मदहन करणार, अशी घोषण सामाजिक कार्यकर्ते देवराव भवते यांनी याप्रसंगी केली. अॅड. श्रीहरी अणे यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आपण पूर्ण विचार करूनच हा निर्णय घेतला आहे. बलिदान दिल्याशिवाय सरकारला जाग येणार नाही, त्यामुळे आपण आपल्या निर्णयावर ठाम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
विदर्भातील जिल्हा अध्यक्षांची नियुक्ती
याप्रसंगी विदर्भ कनेक्टचे विदर्भ अध्यक्ष अॅड. मुकेश समर्थ यांनी विदर्भातील अकरा जिल्ह्याच्या अध्यक्षांची नियुक्ती केली. यामध्ये सी.बी. लढ्ढा (अकोला), अतुल गायगोले (अमरावती), अमोल बोरमोडे (यवतमाळ), राजीव गोरडे (वर्धा), अॅड. विठ्ठल तनपुरे (बुलडाणा), किशोर लांजेवार (भंडारा), दीपक डोहरे (गोंदिया), प्रा. नागपूरकर (वाशिम), अॅड. प्रमोद बोरावार (गडचिरोली), बंडू धोत्रे (चंद्रपूर) यांचा समावेश आहे.