विदर्भ विकासाची हीच सुवर्णसंधी

By Admin | Published: February 3, 2015 01:04 AM2015-02-03T01:04:58+5:302015-02-03T01:04:58+5:30

विदर्भावर आजवर सातत्याने अन्याय झाला. येथे नैसर्गिक साधनसंपदा असूनही विकास झालेला नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीसोबतच येथील जमीन सुपीक आहे. मुबलक पाणी असून वीज आहे.

Vidarbha is the only development of development | विदर्भ विकासाची हीच सुवर्णसंधी

विदर्भ विकासाची हीच सुवर्णसंधी

googlenewsNext

विजय दर्डा यांचे प्रतिपादन : ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’चा समारोप
नागपूर : विदर्भावर आजवर सातत्याने अन्याय झाला. येथे नैसर्गिक साधनसंपदा असूनही विकास झालेला नाही. नैसर्गिक साधनसंपत्तीसोबतच येथील जमीन सुपीक आहे. मुबलक पाणी असून वीज आहे. असे असतानाही गेल्या दहा वर्षात विदर्भातील लाखो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सिंचनासोबतच शाळा, रस्ते व सरकारी योेजनांचा बॅकलॉग आहे. दुसरीकडे युवा वर्गाचे स्वप्न आहे. ते साकार करण्याची जबाबदारी सरकारची आहे. मुख्यमंत्र्यांना ही संधी चालून आली आहे. संधीचे सोने करण्याची जबाबदारी त्यांची आहे, असे प्रतिपादन लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी सोमवारी येथे केले.
विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशनच्या वतीने मानकापूर येथील स्पोर्ट्स स्टेडियम परिसरात आयोजित ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’च्या समारोप प्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. व्यासपीठावर विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष आ. अनिल सोले, महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकर देशमुख, आ. नागो गाणार, आ. डॉ. मिलिंद माने, विभागीय आयुक्त अनुपकुमार, पोलीस आयुक्त के.के. पाठक, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती श्याम वर्धने, महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रभारी-कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे, मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर, मनपा सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, माजी उपमहापौर संदीप जाधव, नवनीतसिंग तुली, जयसिंह चव्हाण, जयश्री फडणवीस होते.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विदर्भाचे असून केंद्रात नितीन गडकरी यांच्यासारखे वजनदार मंत्री आहेत. वित्तमंत्री चंदपूरचे असून ऊर्जामंत्री आपल्या नागपूरचेच आहेत. तेव्हा हीच विदर्भ विकासाची सुवर्णसंधी आहे. परंतु विकास असाच होणार नाही. मुख्यमंत्र्यांना विदर्भाला झुकते माप द्यावे लागेल. विकासाचा आराखडा तयार करावा लागेल. सिंचन क्षमता वाढवावी लागेल. प्रक्रिया उद्योग उभारावे लागतील. मिहानचे दोन भाग आहे. त्यातील कार्गोहब विकसित करावयाचा असेल तर तसे वातावरण तयार करावे लागेल. पर्यटन हे सर्वाधिक रोजगार देणारे क्षेत्र असल्याने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही खा. दर्डा यांनी स्पष्ट केले. उत्कृष्ट आयोजनासाठी जहीर भाई यांचे खा. विजय दर्डा यांच्या हस्ते सुताचा हार व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. संचालन जयंत पाठक यांनी केले. प्रशांत कांबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
उद्योगाचे समिट व्हावे
लोकमतचे संस्थापक संपादक व तत्कालीन उद्योग व ऊर्जामंत्री जवाहरलाल दर्डा यांच्या कार्यकाळात विदर्भात सिमेंट व ऊर्जा प्रकल्प आले. विदर्भात वाहन उद्योग यावे यासाठी मी स्वत: राहुल बजाज, रतन टाटा, होंडा आदी उद्योगपतींसोबत चर्चा केली. प्रफुल्ल पटेल केंद्रात मंत्री असताना त्यांनीही यासाठी पुढाकार घेतला होता, परंतु नंतर काम रखडले. यासंबंधात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा निवेदन सादर केले आहे. विदर्भात उद्योग येण्यासाठी मुख्यमंत्र्यांना नियोजनबद्ध आराखडा तयार करावा लागेल. उद्योजकांना सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील. कामगार कायद्यात सुधारणा करावी लागेल. यासाठी उद्योगाचे समिट व्हावे, असे खा. दर्डा यांनी स्पष्ट केले.विदर्भातील तरुणात निराशा आली आहे. अधिकारीही चांगले मिळाले आहेत. युवा शक्ती जागृत केली तर विदर्भ विकासाचे स्वप्न साकार होईल. औद्योगिक विकासाचे केंद्र होईल. विकासात राजकीय पक्षांनी राजकारण आणू नये, असा सल्लासुद्धा त्यांनी दिला. ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’च्या माध्यमातून आ. अनिल सोले यांनी विदर्भातील युवकांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची प्रसार माध्यमांचीही जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.
विदर्भ हा महाराष्ट्राचा आफ्रिका
युरोपीयन व पाश्चिमात्य राष्ट्रांनी ज्या प्रकारे आॅफ्रिकेतील खनिजसंपदेचा वापर करून स्वत:चा विकास केला आणि आॅफ्रिका तसाच मागासलेला राहिला. विदर्भाचेसुद्धा तेच झाले. विदर्भ हा महाराष्ट्राचा आॅफ्रिका झाला आहे. परंतु आता विदर्भाच्या विकासाचे दिवस आले आहेत. मोठ्या शैक्षणिक संस्था विदर्भात येऊ घातल्या आहेत. येथील मुलांनाच चांगले दर्जेदार शिक्षण मिळणार आहे. त्यामुळे विदर्भातील तरुणांनी ही संधी गमावू नये, असे आवाहन विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.
प्रेरणास्रोत आपल्या आसपासच
शून्यातून विश्व निर्माण करणारे आपल्या आजूबाजूलाच आहेत. मनपा स्थायी समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोरकर यांच्या वडिलांची चहाची टपरी होती. स्वत: नरेदं्र बोरकर हे चहा विकताना मी पाहिले आहे. परंतु त्यांनी आपल्या मेहनतीने आज स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. बंडू राऊत, रश्मी फडणवीस यांनीसुद्धा अतिशय गरिबीतून सुरुवात करीत आज मोठा उद्योग उभा केला आहे. त्यामुळे आपल्या आजूबाजूलाच अशी अनेक माणसे आहेत. ज्यांनी जीवनात शून्यातून विश्व निर्माण केले आहे, त्यांच्यापासून शिका. कौशल्य शिकण्यासाठी मुंबई पुण्याला जाण्याची गरज नाही, असे स्पष्ट मत महापौर प्रवीण दटके यांनी व्यक्त केले.
आवश्यकतेनुसार कौशल्य देण्यास तरुणांची तयारी
विदर्भातील तरुणांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली ‘युथ एम्पॉवरमेंट समिट’ ही केवळ सुरुवात आहे. तीन दिवस चाललेल्या या समिटमध्ये जवळपास २० हजारावर तरुणांनी नोंदणी केली आहे. विविध सत्राला त्यांनी हजेरी लावून मार्गदर्शन घेतले असून उद्योगांना ज्या पद्धतीचे मनुष्यबळ लागेल तसे कौशल्य देण्यास आता विदर्भातील तरुण तयार झाला आहे, असे विदर्भ फॉर्च्युन फाऊंडेशनचे अध्यक्ष आ. प्रा. अनिल सोले यांनी स्पष्ट केले.

Web Title: Vidarbha is the only development of development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.