विदर्भात दुबार पेरणीचे संकट; शेतकरी चिंतेत
By admin | Published: July 9, 2017 03:09 AM2017-07-09T03:09:06+5:302017-07-09T03:09:06+5:30
आधीच विलंबाने दाखल झालेल्या पावसाने दडी मारली असल्याने, विदर्भात बहुतांश जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे, तर काही ठिकाणी पावसाची
- लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आधीच विलंबाने दाखल झालेल्या पावसाने दडी मारली असल्याने, विदर्भात बहुतांश जिल्ह्यांतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे, तर काही ठिकाणी पावसाची प्रतीक्षा असल्याने पेरण्याही अडकल्या आहे.
कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, ६ जुलैपर्यंत नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांत ३२.३७ टक्के, तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत केवळ ३२.७५ टक्के पेरण्या आटोपल्या आहेत. नागपूर विभागात सर्वाधिक कपाशीची ३ लाख ८५ हजार ८०० हेक्टरवर लागवड झाली आहे. मात्र, मागील आठ दिवसांपासून संपूर्ण विदर्भात पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतात उगवलेले पीक करपायला सुरुवात झाली आहे, शिवाय काही भागात उगवणच न झाल्याने दुबार पेरणीची वेळ आली आहे.
विदर्भात २६ जून रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. त्या पहिल्याच दिवशी ४१.२ मिमी पाऊस झाला होता. लागोपाठ २७ जून रोजी ११३ मिमी, आणि ३० जून रोजी ८.४ मिमीपर्यंत पाऊस झाला. अशा प्रकारे ६ जुलैपर्यंत एकूण २४२.६ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसामुळे उत्साहित झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली, परंतु चारच दिवसांत पावसाला ब्रेक लागला. जुलै हा सर्वांधिक पावसाचा महिना समजला जातो, परंतु आठ दिवसांत एक टक्कासुद्धा पाऊ स पडलेला नाही.
पऱ्हाटीला जगविण्यासाठी बादलीने पाणी
चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यातील गोवरी येथील शेतकरी कपाशीला जगविण्यासाठी,
बादलीने पाणी आणून शेतात टाकण्याची धडपड करताना दिसत आहेत.