विदर्भ राज्य आंदोलन समितीचा संपाला पाठिंबा
By Admin | Published: June 5, 2017 05:01 AM2017-06-05T05:01:35+5:302017-06-05T05:01:35+5:30
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला विदर्भ राज्य आंदोलन समितीचा सुरुवातीपासूनच पाठिंबा आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला विदर्भ राज्य आंदोलन समितीचा सुरुवातीपासूनच पाठिंबा आहे. आंदोलनावर आम्ही आजही कायम आहोत. महाराष्ट्र बंदला आमचा सक्रिय पाठिंबा राहील, असे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात कार्यकर्त्यांना अटकही करण्यात आली होती.
अकोल्यात रास्ता रोको
अकोल्यातील अकोट-अमरावती मार्गावरील सावरा फाट्यावर शेतकऱ्यांनी ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. बैलबंडी व जनावरे आणून रस्त्यावर कांदे फेकल्याने वाहतूक ठप्प झाली होती. मुख्यमंत्र्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
पुण्यात बंदचे सावट
शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी पुण्यात भाजीपाला व दुधाची आवक वाढल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला. रविवारी भाज्यांची मुबलक आवक झाल्याने काही प्रमाणात भाव उतरले. मात्र, सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’चे सावट असल्याने सुरळीत होत असलेला बाजार पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये धार कायम
नाशिकमध्ये शेतकरी संपाच्या चौथ्या दिवशी आंदोलनाची धार कायम होती. येवला, दिंडोरी, सिन्नर, निफाड, जायखेडा, सटाणा आदी ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. सिन्नर,ताहराबाद, लासलगाव, देवळा, पिंपळगाव (बसवंत) येथील आठवडे बाजार भरलेच नाहीत. दूध संकलन केंद्र बंद राहिले. सटाणा तालुक्यातील अनेक आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या सुटकेसाठी शेतकऱ्यांनी सहकुटुंब रास्ता रोको आंदोलन केले. तरूण शेतकऱ्यांवर दरोडा व रस्तालुटीचे गुन्हे दाखल करून निरपराध तरूणांना त्यात विनाकारण गोवल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
खान्देशात रास्ता रोको
शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर रविवारी खान्देशात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शहाद्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. कापडणे येथील शेतकऱ्यांनी दूध फेकून न देता आदिवासी वस्तीत वितरित केले.