‘विदर्भात ना कापूस, सोयाबीन खरेदी, ना शेतकऱ्यांना मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 02:52 AM2020-11-06T02:52:13+5:302020-11-06T06:19:20+5:30
farmers : बोंडअळी, बोंडसडीमुळे यंदा विदर्भात कापसाचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झालेले आहे. एकरी सहा क्विंटलऐवजी एक ते दोनच क्विंटल कापूस उत्पादन होत आहे.
मुंबई : विदर्भात अद्याप शासनाकडून कापूस, सोयाबीनची खरेदी सुरू झालेली नाही. दोन्ही पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असताना शासनाकडून कुठलीही आर्थिक मदत मिळालेली नाही याकडे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात लक्ष वेधले आहे.
बोंडअळी, बोंडसडीमुळे यंदा विदर्भात कापसाचे ५० टक्क्यांहून अधिक नुकसान झालेले आहे. एकरी सहा क्विंटलऐवजी एक ते दोनच क्विंटल कापूस उत्पादन होत आहे. अतिवृष्टीने ८० टक्के सोयाबीनचे नुकसान झाले आहे. इतकी गंभीर स्थिती असतानाही कुठेही सरकारच्या वतीने प्रशासनाला कोणतेही निर्देश देण्यात आलेले नाहीत.
स्थानिक प्रशासन पंचनामे करीत असले तरी त्याचा कोणता फायदा होईल, अशी स्थिती जाचक अटींमुळे नाही. अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासंदर्भात जो शासन आदेश काढण्यात आला, त्यात विविध निकष ठेवल्याने विदर्भातील बहुतांश शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहेत. ही मदत दिवाळीपूर्वी द्यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.यावर्षी झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे